सिनेट, अभ्यास मंडळांसाठी सोलापूर विद्यापीठाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर
By बाळकृष्ण दोड्डी | Published: September 3, 2022 02:32 PM2022-09-03T14:32:31+5:302022-09-03T14:32:31+5:30
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्यापरिषद आणि अभ्यासमंडळे या अधिकार मंडळांच्या निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
सोलापूर-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्यापरिषद आणि अभ्यासमंडळे या अधिकार मंडळांच्या निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी २९ सप्टेंबर रोजी यासाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव श्रेणिक शाह यांनी दिली.
अधिसभेच्या प्राचार्य मतदारसंघातून १० सदस्य, संस्था प्रतिनिधीसाठी-६ , शिक्षकांसाठी-१०, पदवीधर मतदारमधून-१० तर विद्यापीठ शिक्षकमधून ३ सदस्य निवडून येणार आहेत. यासाठी आरक्षण विद्यापीठाकडून पूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. विद्यापरिषदेसाठी प्रत्येक विद्याशाखेचे दोन शिक्षक निवडून येणार आहेत. एकूण चार विद्याशाखा आहेत. त्यानुसार सदस्य निवडणुकीद्वारे निवडले जाणार आहेत. त्याचबरोबर अभ्यासमंडळासाठी ही निवडणूक होणार आहे. प्रत्येक अभ्यास मंडळावर तीन महाविद्यालयीन अथवा मान्यताप्राप्त संस्थेचे विभागप्रमुख निवडले जाणार आहेत. या तिन्ही अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आता १२ सप्टेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. १६ रोजी सायंकाळी पाच पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. दि. १७ रोजी उमेदवारी अर्जावर आवश्यक असल्यास माननीय कुलगुरूंकडे अपील करता येणार आहे. रविवार, १८ रोजी पात्र उमेदवारांच्या नावाचे नोटिफिकेशन निवडणूक पोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार आहे. २९ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत शहर व जिल्ह्यातील १६ मतदान केंद्रांवर मतदान होईल. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान मतमोजणी होईल.