चौदावा दीक्षांत सोहळा दिमाखात; सोलापूर विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत स्थान निर्माण करावे : अनिल सहस्त्रबुध्दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 02:57 PM2019-01-19T14:57:48+5:302019-01-19T15:00:32+5:30
सोलापूर : सोलापूर विद्यापीठ हे एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले सुंदर विद्यापीठ असून आतापर्यंत या विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात मोठी ...
सोलापूर : सोलापूरविद्यापीठ हे एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले सुंदर विद्यापीठ असून आतापर्यंत या विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. आता या विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केली.
सोलापूर विद्यापीठाच्या चौदाव्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सहस्त्रबुद्धे हे बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी मंचावर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. बी. घुटे तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि अधिष्ठाता उपस्थित होते. प्रारंभी दीक्षांत मिरवणूक निघाली. त्यानंतर १२ हजार ८५६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यातील पाच हजार ८६३ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून तर सहा हजार ९९३ विद्यार्थ्यानी अनुपस्थित राहून पदवी स्वीकारली. तसेच १३९ जणांना पीएच.डी. पदवी तर ५४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले की, आजच्या काळातील तरुणांसमोर बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. मात्र रोजगारासाठी सक्षम युवक म्हणून स्वत:कडे लक्ष देण्यापेक्षा तरुणांनी उद्योजक व्हावे किंवा स्टार्टअप सुरु करावे. भारत देश स्वतंत्र झाला, त्यावेळी विकसनशील देश होता. मात्र आता हा देश जगातील विकसित देशांपैकी एक बनतो आहे.
विद्यार्थी व अध्यापकांनी आपल्या भूमिकेबाबत आत्मचिंतन करावे. अभ्यासक्रम शिकविण्याच्या पध्द्तीतही बदल केला जावा, उदयोजकांनीही विदयार्थ्यांना नोकरी दिल्यावर त्यांच्या प्रशिक्षणास वेळ द्यावा असे झाले तर स्वप्नातील भारत आपणाला निर्माण करता येऊ शकेल, असे सांगून डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले की, वेळोवेळी अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक ते बदल करणे, त्याचप्रमाणे स्वयम, मूक यासारख्या माध्यमातून नवे अभ्यासक्रम विद्यार्थ्यानी स्विकारण्याची गरज निर्माण झालेली आहे. शिक्षकांनाही नव्या प्रशिक्षणाची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यापीठ गीतानी कार्यक्रमाची सुरुवात झाली तर राष्ट्रगीतानी कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी प्राचार्य व्ही..पी.उबाळे, प्राचार्य डॉ. किर्ती पांडे, डॉ. महेंद्र कदम, डॉ. एस.एस. गोरे या अधिष्ठातांनी त्या त्या विद्याशाखेच्या विद्यार्थ्याना सादर केले़ कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केल्या. मागील वर्षभरात सुवर्णपदकासाठी देणगी दिलेल्या चार देणगीदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दीक्षांत समारंभास अधिसभा सदस्य, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, अधिकारी, पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गाऊन परिधान करून पदवी ग्रहण केली. सूत्रसंचालन डॉ. दीपक ननवरे आणि प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले.