मार्चअखेर सोलापूर विद्यापीठाला मिळणार नवे कुलगुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:38 PM2018-03-15T12:38:27+5:302018-03-15T12:38:27+5:30
सोलापूर विद्यापीठ : मुलाखतीनंतर पाच नावांची राज्यपालांकडे शिफारस
संताजी शिंदे
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. कुलगुरूपदासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अंदाजे १०० च्या आसपास अर्ज दाखल असून, स्क्रुटनी समितीकडून अर्जांची छाननी झाली आहे. मुलाखतीनंतर पाच नावांची शिफारस राज्यपालांकडे केली जाणार आहे. मार्चआखेर विद्यापीठाच्या चौथ्या कुलगुरूची निवड जाहीर होणार आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या स्थापनेनंतर दि. २४ जुलै २००४ रोजी पहिल्या कुलगुरूचा मान डॉ. इरेश स्वामी यांना मिळाला होता. डॉ. इरेश स्वामी यांनी दि. १० सप्टेंबर २००७ पर्यंत कालावधी पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. दि. ११ सप्टेंबर २००७ रोजी प्रभारी कुलगुरू म्हणून विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागातील डॉ. एन. एन. मालदार यांनी पदभार घेतला होता. दि. २६ नोव्हेंबर २००७ रोजी डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी कुलगुरूपदाची सूत्रे घेतली.
दि. २५ नोव्हेंबर २०१२ रोजी डॉ. बाबासाहेब बंडगर यांचा कार्यकाल संपल्यानंतर दि. १० डिसेंबर २०१२ पर्यंत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू एन. जे. पवार यांनी प्रभारी कुलगुरूपद सांभाळले. कुलगुरूपदासाठी डॉ. एन. एन. मालदार यांची निवड झाल्यानंतर दि. ११ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी पदभार घेतला. पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दि. १० डिसेंबर २०१७ रोजी डॉ. मालदार यांचा कार्यकाल संपला. दि. ११ डिसेंबर २०१७ रोजी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्याकडे प्रभारी म्हणून पदभार सोपवण्यात आला आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांच्या वतीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश वेणुगोपाल रेड्डी, बिट्स पिलानीचे संचालक शंतनू चौधरी आणि मुख्यमंत्री कार्यालयातील प्रिन्सिपल सेक्रेटरी प्रवीणसिंह परदेशी यांचा समावेश आहे. दि. ५ मार्च रोजी या समितीची बैठक झाली असून, त्यात कुलगुरूपदासाठी आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली आहे.
पात्र असणाºया अर्जदारांना १५ दिवसांचा नोटीस कालावधी देण्यात आला आहे. अर्जदारांना बोलवून मुलाखती व प्रेझेंटेशन घेतले जाणार आहे. यातील ५ अर्जदारांची नावे राज्यपाल यांच्याकडे पाठवली जाणार आहेत. राज्यपाल यातील एक नाव जाहीर करतात व कुलगुरूची निवड होते. स्क्रुटनी कमिटीची बैठक झाल्याने मार्चअखेर नवीन कुलगुरूची निवड होणार, यात शंका नाही.
चौथे कुलगुरू कोण ?
च्सोलापूर विद्यापीठाच्या स्थापनेनंतर आजवर तीन कुलगुरूंची कारकीर्द पूर्ण झाली आहे. प्रत्येक कुलगुरू कोणत्या ना कोणत्या कामा निमित्त चांगलेच चर्चेत आले आहेत. ‘यथा राजा तथा प्रजा’ असा कारभार आजतागायत सोलापूरकरांना पाहावयास मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी, संघटनांची आंदोलने आदी प्रकार पाहिला तर सतत कोणत्या ना कोणत्या विषयावरून विद्यापीठ चर्चेत राहिले आहे. सध्या डॉ. गणेश मंझा यांनी काही महिन्यांपूर्वी कुलसचिवाचा पदभार घेतला आहे. मार्चअखेर नवीन कुलगुरूचा पदभार घेतील. नवीन कुलसचिवनंतर आता कुलगुरूची निवड होणार आहे. नवीन कुलगुरू कोण असतील, याची उत्सुकता सध्या शहर व जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात लागून राहिली आहे.