औषधी वनस्पती वृक्षांसाठी सोलापूर विद्यापीठ सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:10 PM2019-05-22T12:10:06+5:302019-05-22T12:12:55+5:30
पाच हजार वृक्षांची लागवड; विद्यापीठ परिसर हिरवाईनं सुशोभित
सोलापूर: वैशाख वणव्यानं अवघ्या महाराष्टÑात हाहाकार उडालाय... पर्यावरणाचा समतोल ढासळल्याची चर्चा सर्वत्र होतेय.. वृक्षसंवर्धनासाठी सर्व स्तरांमधून हाक दिली जात आहे. अशा स्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पाच हजार वृक्षांची लागवड करून ती जोपासत विद्यापीठ परिसर हिरवाईनं सुशोभित केला आहे, त्याचबरोबर आरोग्याशी उपयोगी अशी ३० औषधी वनस्पती लावून त्याची योग्य जोपासना केली जात आहे. सर्वांनाच या वृक्षांची माहिती व्हावी, यासाठी त्या वृक्षाचे नाव आणि उपयोगिता याची माहिती डकवली आहे.
शहर-जिल्ह्यामध्ये सध्या वैशाख वणव्याने सर्वत्र वृक्षांची पानगळ होताना दिसतेय. पिण्यासाठी जिथे पाणी उपलब्ध नाही तेथे वृक्षांचे काय, यामुळे झाडेझुडपे नष्ट होत असल्याने जिकडे तिकडे वाळवंटाचे चित्र भासू लागले आहे. अशा स्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमधील सुमारे ५ हजार वृक्ष जणू हिरवी शाल पांघरून सावली देताहेत. येथे औषधी वनस्पतींबरोबरच विविध फळांची, काही जंगली झाडे विद्यापीठात येणाºया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. विद्यापीठात विविध प्रकारचे अनेक वृक्ष औषधी वनस्पती म्हणून गणली जातात, मात्र आतापर्यंत या वृक्षांची वर्गवारी केली नव्हती. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून या औषधी वनस्पतींच्या प्रत्येक वृक्षावर मराठी आणि इंग्रजीमधून त्याचे नाव व उपयोगिता लिहून ते फलक डकवले आहेत. या उपक्रमामुळे विद्यापीठ कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना, शिक्षक व अभ्यासकांनाही हे झाड नेमके कोणते आहे, याचे गुणधर्म आणि फायदे काय आहेत याची माहिती समजू लागली आहे.
या उपक्रमासाठी विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राकडून पुढाकार घेण्यात आला आहे. आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. अभिजित जगताप, सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल माने व त्यांचे सहकारी प्रा. विद्यानंद कुंभोजकर, प्रा. अजित हेरवाडे यांनी यासाठी योगदान दिले आहे.
तीस प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वृक्ष
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एकूण ३० प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वृक्ष आहेत. यामध्ये आवळा, बहावा, बेहडा, कांचन, कण्हेर, रिठा, रुद्राक्ष, गोरखचिंच, सावर, वड, पिंपळ, अशोक, बकुळ, अर्जुन, जांभूळ, शिरस, बेल, साग, रुई, कडुलिंब आदी औषधी वनस्पतींच्या वृक्षांचा समावेश आहे. या सर्व वृक्षांचा मानवी आरोग्यासाठी गुणकारी फायदा होतो, असे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. याशिवाय अभ्यासकांनाही विद्यापीठ कॅम्पसमधील या औषधी वनस्पतींचा संशोधनासाठी फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृषी पर्यटन केंद्रात स्वतंत्र बाग
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे. या संदर्भात प्रमाणपत्र अभ्यासक्रमही विद्यापीठात सुरू झाला आहे. आता या केंद्रामध्ये औषधी वनस्पतींची स्वतंत्र बाग तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भात सध्या तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. आयुर्वेदीय सर्व वृक्ष येथे लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.