सोलापूर विद्यापीठ नामांतर वाद : सरकारी योजनेला सोलापूरच्या सिद्धेश्वरांचे नाव देऊन होणार सन्मान, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:01 PM2017-11-16T14:01:00+5:302017-11-16T14:10:03+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देताना महात्मा बसवेश्वर आणि श्री सिध्देश्वर यांचाही तेवढ्याच तोलामोलाचा सन्मान होईल, असे जाहीर केले आहे. त्यानुसार आगामी दिवसात एखाद्या सरकारी योजनेला बसवेश्वर आणि सिध्देश्वर महाराज यांचे नाव येऊ शकेल, असे मत जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देताना महात्मा बसवेश्वर आणि श्री सिध्देश्वर यांचाही तेवढ्याच तोलामोलाचा सन्मान होईल, असे जाहीर केले आहे. त्यानुसार आगामी दिवसात एखाद्या सरकारी योजनेला बसवेश्वर आणि सिध्देश्वर महाराज यांचे नाव येऊ शकेल, असे मत जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर आणि सिध्देश्वर हे सर्व महादेव भक्त आहेत. शासनाने सोलापूर विद्यापीठाचे नामकरण केल्यानंतर काही समाजकंटक त्याचे राजकारण करीत आहेत. बसवेश्वर आणि सिध्देश्वर यांचाही तोलामोलाचा सन्मान होणार आहे. धनगर आरक्षण आंदोलनात विद्यापीठाच्या नामकरणाबाबत मागणी करण्यात आली होती. इतर मागण्याही पूर्ण होत आहेत, असेही त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेत पुणे, सोलापूर जिल्ह्यातील कामे उत्कृष्ट आहेत. सांगली जिल्हा मागे आहे. शेतकºयांसाठी मूलभूत, पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते.
----------------------
पुणे विभागात ८२३ गावांची निवड
जलयुक्त शिवारमधून २०१७-१८ मध्ये पुणे विभागात ८२३ गावांची निवड करण्यात आली आहे. गावस्तरावर पाणलोटाचे मॅप तयार करण्यात आले आहेत. ग्रामस्तरावर १४ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात गावस्तरावरील सरासरी पाच प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
-----------------
गडकरींमुळे स्थिरीकरणाबद्दल आशा
कृष्णा-भीमा आणि सीना स्थिरीकरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. हा विषय केंद्रीय मंत्र्यांकडे आहे. सुदैैवाने नितीन गडकरी यांच्याकडे हे खाते आहे. त्यांच्याकडे हा विषय विचाराधीन आहे. त्यांनी या विषयांबाबत बजेटची तरतूदही केली आहे, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.