सोलापूर विद्यापीठ ॲक्शन मोडवर; पन्नास हजार उत्तरपत्रिका पोहोचल्या स्कॅनिंग सेन्टरवर
By बाळकृष्ण दोड्डी | Published: June 25, 2023 05:59 PM2023-06-25T17:59:14+5:302023-06-25T17:59:26+5:30
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असून परीक्षांचा निकाल तीस दिवसाच्या आत लावण्यासाठी विद्यापीठाकडून युद्धपातळीवर पर्यंत सुरू आहेत.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असून परीक्षांचा निकाल तीस दिवसाच्या आत लावण्यासाठी विद्यापीठाकडून युद्धपातळीवर पर्यंत सुरू आहेत. उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगसाठी वीस नवीन स्कॅनर मशीनची खरेदी विद्यापीठाने तातडीने केली असून स्कॅनिंगचे काम दोन शिफ्ट मध्ये सुरू आहे. संबंधित प्राध्यापकांना इमेल आणि फोनवरून उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याची सूचना केली आहे. काही कोर्सेसचा निकाल दोन दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी लोकमतला दिली.
सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सोमवार, १९ जून पासून सुरुवात झाली आहे. ७० केंद्रांवर परीक्षा सुरू आहेत. ३१ जुलैपर्यंत चालणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून ११० परीक्षा केंद्रांची रचना करण्यात आली आहे. सुमारे ७५ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे आणि परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर आदींनी शहरातील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.