पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सोलापूर विद्यापीठाकडून मंगळवारपासून प्रवेशपूर्व परीक्षा
By बाळकृष्ण दोड्डी | Published: July 24, 2023 07:47 PM2023-07-24T19:47:22+5:302023-07-24T19:47:40+5:30
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकुलात तसेच संलग्न काही महाविद्यालयांमध्ये विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता प्रवेश घेण्यासाठी उद्या (मंगळवार)पासून प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली.
या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा केंद्रावर जाऊन थेट परीक्षा देण्याची सोय विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. पदवी उत्तीर्ण विद्यार्थी व पदवी अंतिम परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षेसाठी बसता येणार आहे. यासाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया होती. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनाही विद्यापीठाने परीक्षा केंद्रावर जाऊन शुल्क भरून परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी 25 ते 28 जुलै दरम्यान प्रवेश पूर्व परीक्षा होणार आहे.