सोलापूर विद्यापीठात आता उत्तर पत्रिकेची फोटो कॉफी मिळणार ई-मेलवर, विद्यापीठात हायटेक यंत्रणा कार्यान्वीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:57 PM2018-02-16T15:57:03+5:302018-02-16T15:58:13+5:30
परीक्षेत कमी गुण मिळणे किंवा अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना रिचेकिंग (पुनर्तपासणी) साठी हव्या असलेल्या उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी तत्काळ ई-मेलवर पाठवण्यात येणार आहे.
संताजी शिंदे
सोलापूर दि १६ : परीक्षेत कमी गुण मिळणे किंवा अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना रिचेकिंग (पुनर्तपासणी) साठी हव्या असलेल्या उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी तत्काळ ई-मेलवर पाठवण्यात येणार आहे. सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील हायटेक यंत्रणेत दोन स्कॅनिंग मशीन दाखल झाल्या आहेत. या मशीनमुळे विद्यापीठाचा वेळ वाचणार असून विद्यार्थ्यांना तत्काळ पुनर्तपासणी करता येणार आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या सेमिस्टर १, ३, ५ आणि ७ च्या परीक्षा आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल जानेवारी महिन्यात लागला आहे. यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य आणि अभियांत्रिकी या सर्व अभ्यासक्रमांचा समावेश आहे. निकाल लागल्यानंतर विषयाला जर कमी गुण मिळाले असतील किंवा अनुत्तीर्ण झाला असेल तर विद्यार्थ्याला शहानिशा करण्यासाठी उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी दिली जाते. निकाल लागल्यापासून ७ दिवसात विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडे अर्ज करता येतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्राध्यापकांचे मत घेऊन गुण वाढत असतील तर पुन्हा ७ दिवसात उत्तरपत्रिका रिचेकिंग (पुनर्तपासणी) साठी पाठवता येते. रिचेकिंगसाठी पाठवल्यानंतर दोन महिन्यांत पुन्हा तपासणी करून विषयाचा निकाल लावला जातो. या प्रक्रियेला लागणारा वेळ, विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड पाहून कामात गती आणण्यासाठी यंदा सोलापूर विद्यापीठाने दोन स्कॅनिंग मशीन घेतल्या आहेत. सध्या अभियांत्रिकी विषयाच्या सोडल्या तर सर्व विषयांच्या फोटो कॉपी संबंधित विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
स्कॅनिंग मशीनमध्ये एका दिवसात ४०० ते ५०० उत्तरपत्रिका स्कॅन करता येणार आहे. स्कॅन झाल्यानंतर तत्काळ त्या उत्तरपत्रिका संबंधित विद्यार्थ्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविल्या जाणार असून तसा ‘एसएमएस’ मोबाईलवर पाठविला जाणार आहे. अभियांत्रिकीच्या फोटो कॉपी देण्यात आल्या नाहीत, प्रायोगिक तत्त्वावर दोन दिवसात हे काम सुरू केले जाणार आहे. सध्या १४०० फोटो कॉपीचे अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. स्कॅनिंग मशीनमुळे अवघ्या दोन ते चार दिवसात अभियांत्रिकीच्या फोटो कॉपीचे काम पूर्ण होऊन संबंधित विद्यार्थ्यांच्या मेलबॉक्समध्ये पडणार आहेत.
-------------------------
आधुनिक तंत्रज्ञानात भर...
- विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीमध्ये गोपनीयता रहावी म्हणून तंत्रज्ञानाच्या सहायाने दोन वर्षांपूर्वी डिकोडिंग पद्धत सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाचा वेळ आणि मनुष्यबळ वाचवण्यासाठी एक तास आगोदर आॅनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पाठविल्या जात आहेत. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेच्या प्रिंटाऊट काढून विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत. यात भर टाकीत आता उत्तरपत्रिका स्कॅनिंग करून त्या तत्काळ विद्यार्थ्यांच्या मेलबॉक्समध्ये जाणार आहेत.
-----------------
पूर्वी झेरॉक्स काढून फोटो कॉपी दिल्या जात होत्या, यामध्ये वेळ जात होता. विद्यार्थ्यांना तत्काळ फोटोकॉपी मिळावी म्हणून दोन मशीन घेण्यात आल्या आहेत. मार्च/एप्रिल-२०१८ मध्ये होणाºया सर्व परीक्षांचे फोटो कॉपी या मशीनद्वारे स्कॅन करून तत्काळ विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे ई-मेल आयडी व मोबाईल नंबर घेण्यात आले आहेत. भविष्यात मेल आयडीबरोबर बॅँक डिटेल घेवून गुण वाढल्यास भरलेली फी तत्काळ विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहे.
- बी. पी. पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सोलापूर विद्यापीठ.