सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सव; मांडव सजला.. तरुणाई मोहरली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:13 PM2018-10-19T12:13:22+5:302018-10-19T12:19:01+5:30
सोलापूर : उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या युवा महोत्सवासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात एकच लगबग सुरु आहे. मांडव उभारणीचे काम अंतिम ...
सोलापूर: उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या युवा महोत्सवासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात एकच लगबग सुरु आहे. मांडव उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. धूळ उडू नये यासाठी रोलर फिरु लागलाय. दुसºयांदा यजमानपद मिळालेल्या सिंहगड समूहाने तयारी जोरात चालवली असून, यंदाही हटके नियोजन करण्याचा निर्धार केल्याचे स्पष्ट करीत सिंहगड शिक्षण संकुलाच्या प्रशासनाने पुन्हा तयारीचा आढावा घेतला.
महोत्सवात कला सादर करण्यासाठी येणाºया जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या कलावंत संघाच्या निवास, भोजन व्यवस्थेपासून महोत्सव पाहण्यासाठी येणाºया तरुणाई, पालकांच्या स्वागतासाठी कुचराई होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याचे प्राचार्य शंकर नवले यांनी सांगितले.
शनिवारपासून रंगणाºया उन्मेष सृजन रंगाचा या युवा महोत्सवासाठी सिंहगडनगरी सज्ज झाली आहे. २०१५ सालीदेखील विद्यापीठाचा १३ वा युवा महोत्सव नेटक्या नियोजनामुळे लक्षात राहिल्याच्या भावना अनेक कलावंतांनी व्यक्त केल्या. यंदाही हा महोत्सवदेखील देखणा आणि नेटका असणार आहे यात काही शंका नाही, असा विश्वास कार्याध्यक्ष प्रा़डॉ़ शंकर नवले यांनी बोलताना व्यक्त केला.
महोत्सव शांततेत आणि जल्लोषात होण्यासाठी बीट मार्शल, दामिनी पथक आणि बाळे पोलीस चौकीच्या पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. शिवाय महाविद्यालयाचे ६० सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत. काही समस्या उद्भवल्यास युवा महोत्सव समितीशी संपर्क साधल्यास तातडीने त्याचे निराकरण होईल, असे स्पष्ट केले.
९५ सीसीटीव्ही कॅमेºयांची करडी नजर
- सिंहगड संकुलात ९५ सीसीटीव्ही कॅमेरे महोत्सवातील सर्व हालचालींवर करडी नजर ठेवणार आहेत. दूरच्या अंतरावरील छायाचित्रणही ठळकपणे पाहता येणार आहे. सर्व कलावंत, प्रेक्षकांना महोत्सवाचा निर्भेळ आनंद लुटण्यासाठी कडक अंमल करण्यात येत असल्याचे यजमान महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.
दक्षतेसाठी..पीआरएन नंबर सक्तीचा
- महोत्सवात कलाप्रकार सादर करणाºया सर्व विद्यार्थ्यांना स्वतंत्र ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यावर त्याचा पीआरएन नंबर सक्तीचा आहे. त्या दृष्टीने यंत्रणा कामास लागली आहे. यामुळे विद्यार्थी कलावंतांचे नाव, वय, कोणत्या महाविद्यालयाचा ही सर्व माहिती निश्चित होणार आहे. महोत्सवात कला प्रकार सादर करण्यासाठी निर्माण होणारी समस्या पुन्हा उद्भवू नये या दृष्टीने ही दक्षता घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
महोत्सवाची थिम
- महोत्सवात स्त्री सन्मानाचा जागर होणार आहे. त्यासाठी लोगोही प्रसारित करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक रंगमंच, व्यासपीठांना महिलांची नावे दिली आहेत.