विद्याताईंच्या स्त्रीवादी चळवळीला सोलापूरकरांचीही होती साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:07 PM2020-01-31T12:07:45+5:302020-01-31T12:08:24+5:30
सोलापूर शहरातील मान्यवरांची श्रद्धांजली : दिला आठवणींना उजाळा; महिलांच्या राजकारणातील सहभागावर केले होते मार्गदर्शन
सोलापूर : महिलांच्या समान हक्कांसाठी सतत झटणाºया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सामाजिक कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांची ओळख होती. समाजात महिलांवर होणाºया अत्याचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे कार्य त्यांनी मोठ्या प्रमाणात केले होते. त्यांच्या या चळवळीत सोलापूरकरांनीही साथ दिली होती. विद्याताई यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
विद्याताई या १९९७ मध्ये सोलापुरात आल्या होत्या . त्यावेळी त्यांनी हिराचंद नेमचंद वाचनालयात ३० टक्के बायकांचा राजकारणात सहभाग या विषयावर मार्गदर्शन केले.
१९९८ मध्ये दिशा अभ्यास मंडळ या स्त्रिया आणि मुलांसाठी काम करणाºया संस्थेची स्थापना त्यांच्या हस्ते झाली. १९९९ मध्ये ‘जोडीदार जीवनाचा’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी त्या आल्या होत्या.
दिशा अभ्यास मंडळाच्या दशकपूर्तीनिमित्त त्यांनी चाकोरी नावाच्या चित्रपटाद्वारे स्त्रियांनी आपल्या पायातल्या रितीरिवाजांचे साखळदंड कसे काढून टाकले पाहिजेत, हे सांगितले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हिराचंद नेमचंद आणि परिवर्तन अॅकॅडमी यांच्या दोन दिवसांच्या शिबिरासाठी त्या आल्या होत्या. इच्छामरण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता.
या विषयावरील त्यांचे पुस्तक खूप लोकांना भावले. त्यांनी महाराष्ट्रभर या विषयावर व्याख्याने दिली. १९९८ मध्ये सोलापुरात त्या इच्छामरण या विषयावर बोलण्यासाठी आल्या होत्या.
विद्याताई यांनी कायम स्त्री-पुरुष समतेचा आग्रह धरला. मिळून साºया जणी या मासिकातून त्यांनी स्त्रियांचे प्रश्न मांडले. त्या अनेकदा सोलापुरात व्याख्यानासाठी आल्या होत्या. त्या फक्त अभ्यासू वक्त्या नव्हे तर क्रियाशील सामाजिक कार्यकर्त्या होत्या.
- डॉ. श्रीकांत येळेगावकर, कार्यवाह, हिराचंद नेमचंद वाचनालय
स्त्री चळवळीमध्ये स्त्रीला पुरुषाची साथ असायला हवी म्हणून त्यांनी या चळवळीत पुरुषांना सामील करुन घेतले. स्त्रियांना स्वतंत्र विचार व अस्तित्वाची जाणीव करुन दिली. त्यांच्यामुळेच आज लाखो स्त्रिया स्वतंत्रपणाने विचार करत आहेत, मनासारखं आयुष्य जगत आहेत.
- अॅड. नीला मोरे, संस्थापक, दिशा अभ्यास मंडळ
स्त्रियांवर होणाºया अत्याचाराविरोधात जागृती करण्यासाठी विद्याताई यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केडर उभे केले होते. पुरोगामी चळवळीतील त्या अग्रणी होत्या. वयाच्या ८३ व्या वर्षीही त्या व्याख्याने देत होत्या. देशात महिलांसाठी काम करणाºयांमध्ये त्यांचे नाव हे सदैव पुढे राहील.
- दत्ता गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
ज्या काळात आम्ही सामाजिक कार्यात भाग घेत होतो, त्या काळात विविध विषयांवर प्रबोधन करण्याची गरज होती. हे काम विद्यातार्इंनी केले. राज्यातील स्त्रियांमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावरही खूप प्रभाव पडला होता.
- निर्मलाताई ठोकळ, माजी आमदार