सोलापुरात पाणी फाउंडेशनच्या कामाचं ‘तुफान आलंया..’
By admin | Published: April 13, 2017 02:38 PM2017-04-13T14:38:02+5:302017-04-13T14:38:02+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
अरुण बारसकर - सोलापूर
आमच्या गावाला विशेष अशी ओळखच नव्हती, आम्ही राळेरासचे़़़ असे सांगितल्यानंतर बार्शी तालुक्यातील का?, असे लोक विचारायचे, आता आमच्या गावाला आमीर खानने श्रमदान केलेले राळेरास, अशी नवी ओळख निर्माण झाल्याची भावना युवा वर्गाने व्यक्त करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावर आमीर खानने हात जोडून गावकऱ्यांचे आभार मानले.
पानी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलेल्या राळेरास येथे ग्रामसभेत आमीर खान यांनी संवाद साधताना गावकऱ्यांनी या भावना व्यक्त केल्या. सत्यमेव जयते पानी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील ३० गावांनी भाग घेतला असून, यापैकी राळेरास गावात सुरू असलेल्या श्रमदानात आमीर खान, त्यांच्या पत्नी किरण राव, पानी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, डॉ. सत्यजित भटकळ, वेळू गावचे सुखदेव भोसले, उत्तरच्या उपसभापती रजनी भडकुंबे, संभाजी भडकुंबे, गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे आदींसह पाणी फाउंडेशन सदस्य व गावकरी उपस्थित होते. आमीर खान यांनी ग्रामस्थांना ४० लोकांच्या सततच्या श्रमदानातून अजिंक्यतारा भागाचे पाण्याचे चित्र बदलले, तुमच्या-आमच्या दोन हाताच्या श्रमदानातून पुढील पाच-सहा वर्षांत संपृूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त व पाणीदार होईल, हे राळेरास ग्रामस्थांच्या आत्मविश्वासातूनच दिसत असल्याचे प्रतिपादन सिनेअभिनेते व पानी फाउंडेशनचे आमीर खान यांनी केले. ग्रामसभेचा समारोप करताना दंगल चित्रपटातील कल सुबह पाच बजे आना या डायलॉगची आठवण करुन देत गावकऱ्यांना सकाळी पाच वाजता श्रमदानासाठी येण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामसेविका माधुरी सुरवसे, फाउंडेशनच्या तृप्ती शिंदे, सचिन सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच नंदिनी माने, उपसरपंच सीताराम साबळे, कैलास नागवडे, शाहीर डांगे, सचिन सूर्यवंशी, विमल माने, संगीता डांगे, नागनाथ मानेंसह ग्रामस्थ, महिला व बालक उपस्थित होते.
--------------------------
- आमीर खान व किरण राव यांनी वृक्षारोपणासाठीचा खड्डा तसेच शोषखड्डे खोदणे व भरण्यासाठी श्रमदान केले.
पाणी नक्की मिळेल : किरण राव
- यावेळी आमीर खान यांच्या पत्नी किरण राव यांनी आपल्या गावातून चांगली वागणूक व प्रेम मिळाले, एकत्र येऊन पाणलोटचे काम करताहेत हे चांगले आहे, तुम्हाला पाणी नक्की मिळेल, कपही जिंकाल, असा संवाद साधला.
- हे काम खूप मोठे आहे, जे तुम्ही आज करीत आहात, गावाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही परंतु गरिबांच्या हाताचे काम संपूर्ण महाराष्ट्र पाहील व राज्याला प्रेरणा मिळेल, असे पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले.
- मी पानी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेतल्यानंतर झपाटल्यागत कामाला लागलो, मिलिटरीतला असल्याने गुडघ्यात मेंदू आहे असे लोक म्हणायचे,वेड्यात काढायचे, मात्र गावात काम झाल्यानंतर १० वर्षे सुरु असलेला टँकर बंद झाला, आज म्हणूनच मी तुमच्यासमोर उभा आहे, वेडेच लोक इतिहास घडवितात असे मागील वर्षी राज्यात प्रथम आलेल्या वेळू गावचे सुखदेव भोसले यांनी सांगितले.
- तालुक्यातील प्रशिक्षण घेतलेल्या ३० गावांपैकी १२ गावांत मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून उर्वरित गावांतही कामे सुरू होतील व वॉटर कप जिंकण्यापर्यंत काम करतील, असा विश्वास गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे यांनी व्यक्त केला.