विजेच्या व्यत्ययामुळे सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:55 PM2018-06-15T12:55:50+5:302018-06-15T12:55:50+5:30
तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत होणार याची आशा धरून बसलेल्या नागरिकांना विजेच्या खोळंब्यामुळे पुन्हा शॉक दिला.
सोलापूर : औज बंधारा भरल्याने आता तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत होणार याची आशा धरून बसलेल्या नागरिकांना विजेच्या खोळंब्यामुळे पुन्हा शॉक दिला आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने औज बंधारा भरल्याने दोन महिने पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज व्यक्त करून तीन दिवसाआड पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. या नियोजनाची एक फेरी होण्याअगोदरच गुरुवारी विजेच्या खोळंब्याने पाणीपुरवठा विस्कळीत केला आहे. टाकळी पंपगृहास बुधवारी तासभर व गुरुनानक पंपाचा अडीच तास वीजपुरवठा खंडित झाला.
गुरुवारी दिवसभर टाकळी पंपगृहाच्या वीज पुरवठ्यात व्यत्यय येत गेला. सकाळी साडेसहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत वीज ये-जा करीत राहिल्याने टाकळी पंपगृहातील पंप व्यवस्थित चालू शकले नाहीत. त्यामुळे पाणी उपसा मंदावला. त्याचबरोबर दुपारी अडीच ते सायंकाळी उशिरापर्यंत मेडिकल पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. हद्दवाढ विभागात रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा करावा लागला. तसेच टाकळी येथून पुरेसा पाणी उपसा न झाल्याने शुक्रवारचा पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.