युरोपियन योजनेत देशातील बारा शहरांमध्ये सोलापूरचा समावेश,औद्योगिक, सांस्कृतिक बाबींमध्ये होणार देवाण-घेवाण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:31 PM2018-01-17T14:31:24+5:302018-01-17T14:32:31+5:30
केंद्र शासनाच्या शाश्वत नागरी विकास योजनेसाठी देशातील १२ शहरांमध्ये सोलापूरचीही निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. याबाबत युरोपियन युनियनचे मनपाला पत्र आले आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १७ : केंद्र शासनाच्या शाश्वत नागरी विकास योजनेसाठी देशातील १२ शहरांमध्ये सोलापूरचीही निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. याबाबत युरोपियन युनियनचे मनपाला पत्र आले आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शहरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करणे, उद्यानांची संख्या वाढविणे, लोकांना दैनंदिन स्वच्छ व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे, शहरात अद्ययावत ड्रेनेजची सुविधा देणे अशा सुविधा देऊन एक आदर्श शहर निर्माण करणे यासाठी जागतिक स्तरावर भारत व युरोपातील प्रत्येकी १२ शहरे निवडून भारतातील प्रत्येक शहराची युरोपातील शहराबरोबर जोडी लावण्यात येणार आहे. अशाप्रकारे युरोपातील शहर व भारतातील शहर यांचा संयुक्त अभ्यास करून आपले शहर विकसित करण्यासाठी प्रस्ताव देण्याबाबत सोलापूर मनपास युरोपियन युनियनचे पत्र आले होते. या योजनेसाठी आवश्यक असणारा नोंदणी अर्ज भरून आयुक्त व माझ्या स्वाक्षरीने युरोपियन युनियनकडे आॅक्टोबर २०१७ मध्ये पाठविण्यात आले होता. या अर्जावरून या योजनेसाठी सोलापूरची निवड झाल्याचे पत्र १५ जानेवारी रोजी युनियनचे पहिले कौन्सिलर हेनरीट फारेज यांनी मनपाला पाठविले आहे, असे महापौर बनशेट्टी यांनी सांगितले.
युरोपियन युनियनच्या मदतीने केंद्र शासनाने शाश्वत नागरी विकास योजना तयार केली आहे. या योजनेत शहराचा विकास करताना युरोपातील शहरांचा अभ्यास करून नागरी सुविधांमध्ये सुधारणा कशा पद्धतीने करावयाची हे ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेत सोलापूरची निवड झाल्याने मोठा फायदा होणार असल्याचे बनशेट्टी यांनी सांगितले. या योजनेतून शहरातील औद्योगिक, सांस्कृतिक, शौक्षणिक बाबींमध्ये देवाण-घेवाण करता येणार आहे. सोलापूर शहराचा नागरी विकास हा जागतिक स्तराप्रमाणे होण्यास या योजनेचा उपयोग होईल.
या योजनेतून श्री सिद्धेश्वर मंदिर, भुईकोट किल्ला, धर्मवीर संभाजी तलाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास शहराच्या गुणवत्तेमध्ये भर पडेल. आपले शहर स्वच्छ, सुंदर, हरित ठेवल्यास वरील सर्व गोष्टी साध्य होणार आहेत.
---------------------
अशी होणार सुरुवात
केंद्र शासनाच्या शाश्वत नागरी विकास योजनेंतर्गत नेमून दिलेल्या युरोपातील शहरांचे प्रतिनिधी मंडळ सोलापुरात येणार आहे. त्याचबरोबर युरोपातील शहरांचा विकास पाहण्यासाठी येथील प्रतिनिधी मंडळ युरोपामध्ये जाणार आहे. वातावरण, ऊर्जा आणि पर्यावरण बदल यावर या योजनेत भर दिला जाणार आहे. यासाठी येत्या काही दिवसात याबाबत विशेष उपक्रम घेतला जाणार आहे.