सोलापुरात बसपोर्ट होणारच....

By admin | Published: June 26, 2016 08:16 PM2016-06-26T20:16:21+5:302016-06-26T20:16:21+5:30

राज्यात ९ बसपोर्ट होणार आहेत. त्यात सोलापूरचाही समावेश करण्यात आला असून, सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शनिवारी येथे बोलताना दिली.

Solapur will get buses ... | सोलापुरात बसपोर्ट होणारच....

सोलापुरात बसपोर्ट होणारच....

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २६ -  राज्यात ९ बसपोर्ट होणार आहेत. त्यात सोलापूरचाही समावेश करण्यात आला असून, सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शनिवारी येथे बोलताना दिली. 
स्मार्ट सिटी मिशन वर्षपूर्ती कार्यक्रमानिमित्त महापालिकेच्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेतील ग्रीन स्पेस डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत हुतात्मा बाग पुनर्विकास व सुशोभीकरणाचे भूमिपूजन महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे होते तर याप्रसंगी आमदार अ‍ॅड. रामहरी रूपनवर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सुभाष देशमुख, केंद्र शासनाचे सचिव लक्ष्मणा, उपमहापौर प्रवीण डोंगरे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, स्थायीचे सभापती रियाज हुंडेकरी, भाजपचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. 
प्रारंभी आयुक्त विजयकुमार काळम यांनी स्मार्ट सिटी योजनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. महापौर सुशीला आबुटे यांनी  शहराच्या विकासासाठी राजकारणातील गोष्टींना तिलांजली देऊन केंद्र शासनाच्या योजनेत सहभाग नोंदविला. अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागाने आज ही योजना साकारत असल्याचे नमूद केले. उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही राजकारण न करता शहरांची निवड केल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे सांगितले. आमदार परिचारक यांनी स्मार्ट सिटी योजना चळवळ बनण्याची गरज असल्याचे सांगितले तर आमदार सुभाष देशमुख यांनी एकेकाळी सोलापूर चौथ्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळख होती ती आता मागे पडली आहे. पालकमंत्र्याकडे भरपूर खाती असून, त्यांनी उर्जीतावस्थेसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री देशमुख यांनी स्मार्ट सिटी योजनेचा माझ्या मतदारसंघात कार्यक्रम होत असल्याने आनंद होत असल्याचे नमूद केले. बालपणीच्या आठवणी सांगत हुतात्मा बागेची दुरवस्था झाल्याचे निदर्शनाला आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शहराच्या विकासासाठी स्मार्ट सिटीची योजना दिली. यात मुख्यमंत्री फडणवीस यांचे योगदान मोठे आहे. कामगारांचा प्रश्नासाठी कुंभारीतील एमआयडीसीबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या वतीने सुनील धरणे व चतुरबाई शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्रीय सचिव लक्ष्मणा यांनी  शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ यांनी केले तर विरोधी पक्षनेता नरेंद्र काळे यांनी आभार मानले.
 
श्रेयावरून चढाओढ...
स्मार्ट सिटी योजनेसाठी आपणच कसे योगदान दिले, याचे श्रेय घेण्यात चढाओढ दिसून आली. असाच प्रकार व्यासपीठावर खुर्ची मिळविण्यावरून झाला. नियोजनात निमंत्रित व पदाधिकाºयांना व्यासपीठावर आसने उपलब्ध केली होती. पण प्रमुख पाहुणे येण्यास विलंब झाला. प्रत्येक पाहुण्याबरोबर आलेल्यांनी व्यासपीठावरील खुर्च्या बळकावल्या. पदाधिकाºयांबरोबर सदस्यांनी पाहुण्याशेजारी ठिय्या मारला. पालकमंत्र्यासोबत आलेल्या विरोधी पक्षनेत्यास खुर्ची मिळत नव्हती. पालकमंत्री देशमुख यांनी स्मार्ट सिटीत सोलापूरचा आठव्या क्रमांकाने (वास्तविक क्रमांक नववा) समावेश झाल्याचा उल्लेख वारंवार केला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावातही नरेंद्र फडणवीस अशी गफलत केली. शिवसेनेचे सदस्य कार्यक्रमाला अनुपस्थित होते.
कोण काय म्हणाले़़़
सोलापूर नगरीला ऐतिहासिक व धार्मिक वारसा आहे. अनेक अडचणी व विरोधाला पार करीत स्मार्ट सिटीची परीक्षा पास झालो. यात सर्वांचे योगदान आहे. स्मार्ट सिटीच्या निमित्ताने परदेश दौरा करण्याची संधी मिळाली. तेथील सुंदर शहरे पाहून आपले सोलापूरही असे स्मार्ट व्हायला हवे, अशी अपेक्षा बाळगून आहे. 
- सुशीला आबुटे, महापौर
 विकासकामे करताना महानगरपालिकेचे कर्मचारी बेफिकीर असतात. नवीन काम करून जुना कचरा तसाच ठेवला जातो. आता स्मार्ट सिटीमुळे ही मानसिकता बदलावी लागेल.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उड्डाणपूल योजना मंजूर केली. नुसते रस्ते मोठे होऊन चालत नाही, तर शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. 
- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री
हद्दवाढ भाग २५ वर्षांपासून उपेक्षित आहे. तेथे ही योजना व्हायला हवी होती. स्मार्ट सिटी म्हणून पोटाची खळगी भरली जाऊ नये. सोलापुरात विडी व यंत्रमाग कामगारांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांना रोजगार देणारे नवे उद्योग यायला हवेत. शहराजवळ धार्मिक स्थळे असल्याने आध्यात्मिक पर्यटनाला जोड देऊन रोजगार निर्मितीचा प्रयोग व्हावा. 
- सुभाष देशमुख, आमदार
पावडर, लाली व चांगले कपडे घातले म्हणून स्मार्ट होता येणार नाही. स्मार्ट सिटीबरोबर आता महापालिकेसमोर मोठी आव्हाने आहेत. लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी आहे. यात लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे असून, स्मार्ट सिटी ही योजना लोकचळवळ बनावी, त्यात लोकांचा सहभाग व्हावा, अशी अपेक्षा आहे. 
- प्रशांत परिचारक, आमदार
सोलापूर शहर स्मार्ट सिटीत येण्यासाठी या आधी काम केलेल्या सर्वांचे योगदान आहे. अस्तित्वातील शहरे नव्याने स्मार्ट करण्याचा हा जो प्रयोग होत आहे तो चांगला आहे. शहर सुधारणेबरोबरच लोकांची मने स्मार्ट झाली पाहिजेत. जे चांगले केले त्याचे जतन व्हायला पाहिजे, यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. 
 - रामहरी रुपनवर, आमदार
कच-याचा प्रश्न सोडविण्यासाठी दीड वर्षापूर्वी कचरा विकत घेण्याची संकल्पना मांडली. यातून कचºयाची समस्या सुटेल व त्यातून वीजनिर्मितीच्या प्रकल्पास चालना मिळेल. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेत कोणतेही राजकारण न करता शहरांची निवड केली, त्याचा मला अभिमान आहे. 
- प्रवीण डोंगरे, उपमहापौर
यापूर्वी नगरोत्थान योजनेतून कोट्यवधी रुपये खर्चून १९ बागांचा विकास करण्यात आला. पण आज त्या बागांची दुरवस्था झाली आहे. एकीकडे विकास तर दुसरीकडे भकास, अशी अवस्था आहे. पाणी व स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ढग येतात पण पाऊस पडत नाही. पालकमंत्र्यांनी कृत्रिम पावसाबाबत पाठपुरावा करावा. 
- संजय हेमगड्डी, सभागृहनेता

Web Title: Solapur will get buses ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.