सोलापूरात स्मार्ट सिटीच्या कामासाठी ८२ दुकाने हलविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:05 PM2018-06-29T15:05:55+5:302018-06-29T15:08:42+5:30
सोलापूर : पंचकट्टा ते विजापूर वेस असा १८ मीटरचा रस्ता विकसित करण्यासाठी मोजणी करून खुणा करण्याचे काम करण्यात आले. शनिवारी या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून पंचकट्टा ते विजापूर वेस तेथून लक्ष्मी मार्केटकडील मारुती मंदिर आणि तेथून परत पंचकट्टा अशा त्रिकोणी भागातील रस्ता स्मार्ट करण्यात येणार आहे. पंचकट्टा ते विजापूर वेस या मार्गावर ८२ दुकाने आहेत. येथील मूळ रस्ता २४ मीटरचा आहे. पण दुकानांच्या अतिक्रमणामुळे इतकी रुंदी उपलब्ध होत नाही. त्यामुळे महापालिकेने यापूर्वीच येथील दुकानदारांना रस्ता मोकळा करण्याबाबत नोटिसा दिल्या होत्या. त्यावर दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत नोटिसीला उत्तर देत स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दाखविली आहे.
त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी गुरुवारी महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे मोजमाप करण्याची मोहीम घेण्यात आली. बांधकाम विभागातील कर्मचाºयांनी रस्त्याच्या मध्यापासून १८ मीटरची रुंदी घेत दुकानांपर्यंतची हद्द निश्चित केली. या हद्दीपर्यंतचे अतिक्रमण काढून घ्यावे अशा सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. मोजमाप घेण्याचे काम सायंकाळपर्यंत चालले. आणखी काम राहिलेले असून, शुक्रवारी मोहीम घेतली जाणार असल्याचे परवाना विभागाचे उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले. मोजमाप पूर्ण झाल्यानंतर शनिवारी निश्चित केलेल्या हद्दीपर्यंत रस्ता मोकळा करण्याची मोहीम घेतली जाणार आहे.
राजेश्वर नगरसाठी रस्ता खोदला
- महिला हॉस्पिटल ते कुमठा नाकापर्यंतचा रस्ता नगरोत्थान योजनेतून केला आहे. ड्रेनेज चेंबरसाठी हा रस्ता दोनवेळा खोदण्यात आला. राजेश्वर नगरमधील ड्रेनेज चोकअप होत असल्याने मोठी लाईन घालण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आल्याचे सांगण्यात आले. मनपा कर्मचाºयांच्या वसाहतीसाठी ही तत्परता दाखविण्यात आली आहे.