सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत महानगरपालिका व सिव्हिल हॉस्पिटलवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणार, पहिला टप्पा ८४५ किलो व्हॅटचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 11:20 AM2018-02-02T11:20:37+5:302018-02-02T11:23:57+5:30
स्मार्ट सिटी प्रकल्पातून मनपा व सिव्हिल हॉस्पिटलमधील इमारतीवर पहिल्या टप्प्यात ८४५ किलो व्हॅट क्षमतेचा सौरऊर्जेचा प्रकल्प साकारण्याच्या कामाला लवकर सुरुवात होणार आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २ : स्मार्ट सिटी प्रकल्पातून मनपा व सिव्हिल हॉस्पिटलमधील इमारतीवर पहिल्या टप्प्यात ८४५ किलो व्हॅट क्षमतेचा सौरऊर्जेचा प्रकल्प साकारण्याच्या कामाला लवकर सुरुवात होणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पातून सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातून सोलापुरात तीन टप्प्यात दोन मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. सध्या बाजारात १ किलो व्हॅट वीज निर्मितीचे सोलर संच ६२000 उपलब्ध आहेत. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने सोलापुरात हा प्रकल्प राबविण्यासाठी केंद्रस्तरावर टेंडर मागविण्यात आले होते. यात राष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक दरातून सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीने सर्वात कमी बजेटमध्ये म्हणजे ३५000 दर दिला आहे. या कंपनीने पहिला टप्पा उभारण्याचे काम पुण्याच्या व्होल्टेज इंप्रा या कंपनीला काम दिले आहे. आठवडाभरात मनपाच्या इमारतीवर सौरऊर्जा निर्माण करणारे संच बसविण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात हुतात्मा स्मृती मंदिर, कौन्सिल हॉल, प्रशासकीय इमारतीवर प्रत्येकी ५0 किलो व्हॅटचे संच बसविले जाणार आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार तथा सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्व इमारतींवर ६९५ किलो वॅटचे संच बसविण्यात येणार आहेत. यासंबंधी मनपा, रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि करारदार कंपनीबरोबर करार करण्यात येत आहे. या करारानुसार सिव्हिल हॉस्पिटलच्या विजेच्या बिलातून उरलेली रक्कम मनपाला मिळणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात सौरऊर्जेसाठी ८ कोटी निधीची तरतूद आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे तीन कोटी खर्च होतील असा अंदाज आहे.
--------------------
दुसरा टप्पा पंप हाऊस....
- शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मनपाचे १६ पंपिंग हाऊस आहेत. त्यापैकी तीन पंपिंग हाऊसचे काम सध्या अमृत योजनेतून करून घेण्यात येत आहे. दुसºया टप्प्यात उरलेल्या १३ पंपिंग हाऊसवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव आहे. पंपिंग हाऊसचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याचा अहवाल सादर झाल्यावर प्रत्यक्षात प्रकल्प साकारण्याच्या हालचाली होतील. तिसºया टप्प्यात इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याबाबत विविध परवानग्या घेण्याचे काम सुरू आहे. स्मार्टरोडचे कामही प्रगतिपथावर आहे. गड्डायात्रेसाठी पादचाºयांसाठी खुला केलेला हा रस्ता ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पुढील कामाकरिता बंद करण्यात आला असल्याचे सहायक अभियंता तपन डंके यांनी सांगितले.