सोलापूरचा युवक तीन महिन्यांपासून नेपाळमध्ये बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:34 PM2018-09-03T12:34:08+5:302018-09-03T12:36:55+5:30
हतबल मायबाप लेकराच्या शोधात : पोलिसांचाही शोध सुरू; सरकारने हस्तक्षेप करण्याची कुटुंबाची मागणी
माळशिरस : माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी हे दुष्काळाच्या छायेतील गाव़ संसाराला हातभार लागाव म्हणून वडील बाळू साठे यांनी विकासला कामासाठी नेपाळमध्ये पाठवले. तेथे गेल्यापासून तो संपर्कात होता. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्कच होईना. तो बेपत्ता झाला की काय या चिंतेत त्याच्या कुटूंबातील सदस्य बसले आहेत. राज्य सरकारने त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी साठे कुटूंबीयाने केली आहे.
अपंग वडील, आई, तीन भाऊ, दोन बहिणी असे हे साठे कुटुंब़ त्यातील थोरला भाऊ सागर आपले कुटुंब व आईला घेऊन ऊस तोडणीसाठी कोल्हापुरातील कागलच्या साखर कारखाना कार्यक्षेत्रात गेला़ एका बहिणीचे लग्न झाले व ती बाळंतपणासाठी गावाकडे आली. वडील, दोन लहान भाऊ व एक बहीण घरीच होते. पैशाची चणचण वाढू लागली़ बहिणीच्या बाळंतपणाचा खर्च भागविण्यासाठी वडील बाळू साठे यांनी गावातील दीपक गोडसे यांच्याकडून पैसे घेऊन १६ वर्षीय विकासला जानेवारी २०१८ मध्ये कामासाठी नेपाळला पाठवले़ तो तेथे गेल्यानंतर कुटुंबाच्या संपर्कात होता, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्क होईना अन् इकडे त्याचे मायबाप लेकराच्या शोधात हतबल झाले आहेत़
शिंगोर्णी गावातील ३० ते ३५ तरुणांची रोजगारासाठी कुठे ना कुठे भटकंती कायम असते. घरच्या परिस्थितीमुळे कोवळ्या वयातच शिक्षणाला रामराम ठोकून ही मुले रोजगाराच्या वाटा शोधण्यासाठी बाहेर पडतात़ सोलापूर-सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या शिंगोर्णी गावातील विकास साठे हाही रोजगारासाठी दीपक जयराम गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेला.
१२ जानेवारी २०१८ रोजी तो नेपाळमधील गोरखा या ठिकाणी सोने-चांदीच्या दुकानात कामासाठी गेला़ त्यानंतर मे २०१८ पर्यंत त्याचा संपर्क होत होता, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्क नाही़ त्यानंतर विकासच्या आईने दीपक गोडसे यांना संपर्क करून माहिती विचारली असता तो आपल्याबरोबर नाही, असे उत्तर मिळाले़ त्यानंतर त्याच्या आईने माळशिरस पोलीस ठाणे गाठले़ पोलिसांकडे मदतीची अपेक्षा केली़ मात्र अपुºया माहितीमुळे पोलिसांनाही तपासाची दिशा मिळेना़
मदतीची अपेक्षा
च्साठे कुटुंबातील आई, वडील, भाऊ हे नेपाळमध्ये हरवलेल्या विकास साठे याचा शोध घेण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून फिरत आहेत, मात्र त्यांना लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाकडून ठोस दिशा मिळत नाही. यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हे हतबल कुटुंब करीत आहे़ कारण तेथील सरकारशी बोलणी झाल्यानंतरच यातून मार्ग निघणार आहे. सध्या विकास हा तेथून निघून गेला की चुकला, भाषेची अडचण, कोणाला भेटावे व यात कोण मदत करेल? असा प्रश्न साठे कुटुंबाला पडला आहे़
आम्ही ऊस तोडणीसाठी गेलो असता माझा भाऊ विकास हा कामासाठी वडिलांना सांगून दीपक गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेला़ मात्र गेल्या तीन महिन्यांपासून तो संपर्कात नाही़ शिवाय तो गोडसे यांच्याबरोबरही नाही़ मग तो कोठे असेल? काय करीत असेल? असा प्रश्न पडतोय़ आता माझा भाऊ शोधण्यासाठी शासन, प्रशासनाने पुढाकार घ्यावा, हीच अपेक्षा आहे़
- सागर साठे,
विकासचा भाऊ