सोलापूर जिल्हा बँकेकडे पैसे नसल्याने खरिपाचे कर्ज वाटप ४० कोटींनी कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:37 PM2019-07-23T13:37:38+5:302019-07-23T13:39:43+5:30
दुष्काळ व कर्जमाफीचा परिणाम; माफीच्या अपेक्षेने शेतकºयांनी रक्कमच भरली नाही
सोलापूर: संपूर्ण कर्जमाफी होईल या अपेक्षेने आजही शेतकरी बँकांचे कर्ज भरण्यास तयार नाहीत त्यातच पाऊस नसल्याचाही परिणाम झाला असून, खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप मागील वर्षीच्या तुलनेत ४० कोटीने कमी झाले आहे. जिल्हा बँकेकडे पैसे नसल्याचीही प्रमुख अडचण आहेच.
सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा अशी ओळख असली तरी मागील काही वर्षांत खरीप पेरणीचे क्षेत्रही वाढले आहेच. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला खरीप हंगामासाठी ३०३ कोटी ९२ लाख ९७ हजार रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे.
या हंगामात सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकाशिवाय उसाची लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जाते व जिल्हा बँक ऊस लागवडीसाठी एकूण कर्जाच्या ६५ टक्के कर्ज उसासाठी देते. मागील दोन-तीन वर्षांत राज्यातील काही जिल्ह्यात सलग दुष्काळी परिस्थिती असल्याने संपूर्ण कर्जमाफीची मागणी होत होती. राज्य शासनाने दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले असून आजही संपूर्ण कर्जमाफी होईल या अपेक्षेने शेतकरी कर्ज भरण्यास तयार नाहीत. याशिवाय जुने कर्ज भरले तर नव्याने कर्ज बँका देतात; मात्र पाऊस नसल्याने शेतात पीकच नसल्याने बँका कर्ज देतीलच असे नाही. यामुळे शेतकरी कोणतेही कर्ज भरण्यास तयार नाहीत.
मागील वर्षी खरीप हंगामासाठी आतापर्यंत १६८ कोटी ९६ लाख ७९ हजार रुपये पीक कर्ज वाटप झाले होते. यावर्षी त्यात ४० कोटीने घट झाली आहे.
यावर्षी आतापर्यंत १२८ कोटी ८५ लाख ९४ हजार रुपये पीक कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यात पाऊस म्हणावा तसा किंवा खरीप पिकांसाठी पोषक तेवढा पडला नसल्याने शेतकरी पीककर्ज मागणीसाठी बँकांकडे येत नाहीत. जिल्हा बँकेकडे कर्ज देण्यासाठी पैसेच नसल्याने जे शेतकरी पूर्वीच्या कर्जाचा भरणा करतील व भरणा केलेलीच रक्कम त्या शेतकºयाला नव्याने कर्ज म्हणून दिली जात आहे. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा यावर्षी कर्ज वाटप कमी झाले असल्याचे सांगण्यात आले.
तर कर्ज वाटपाचा आकडा वाढेल..
सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात उसाची लागवड केली जाते व जिल्हा बँकही ऊस लागवडीवर कर्ज देते. जुने कर्ज शेतकरी भरतात व नव्याने कर्जही बँक देते. यापुढील नक्षत्रात चांगला पाऊस पडला,उजनी धरण, तलाव भरले तर उसाच्या लागवडीला वेग येईल व कर्ज वाटपाचा आकडाही वाढेल असे सांगण्यात आले.