सोलापूर जिल्हा परिषदेत अर्थसंकल्पाची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:16 PM2018-03-23T12:16:26+5:302018-03-23T12:16:26+5:30
छोटा ट्रॅक्टर, जास्तीत जास्त मुलींना सायकल देण्याचा प्रयत्न, सभापती विजयराज डोंगरे यांची माहिती
सोलापूर : फळबागेमध्ये फवारणीसाठी लागणारा छोटा ट्रॅक्टर, जास्तीत जास्त विद्यार्थिनीना सायकल, दुर्धर आजारासाठी जास्तीची तरतूद अशा अनेक नावीन्यपूर्ण गोष्टींचा समावेश पुढील अर्थसंकल्पात व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. उत्पन्न कमविणे हा जिल्हा परिषदेचा प्राथमिक उद्देश नाही. परंतु, जिल्ह्यातील सामान्य माणसांपर्यंत झेडपीच्या आणि शासनाच्या योजना पोहोचाव्यात, यासाठी उपकर संकलनात वाढ करण्याचा प्रयत्न आहे, असे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी सांगितले.
झेडपीच्या अर्थ व बांधकाम समितीची सभा डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समितीचे सदस्य भारत शिंदे, सचिन देशमुख, रोहिणी मोरे, शुभांगी उबाळे, अंजनादेवी पाटील, समता गावडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख बैठकीला उपस्थित होते. नावीन्यपूर्ण योजनांच्या सूचना कराव्यात, यासाठी उमेश पाटील यांनाही या सभेला आमंत्रित करण्यात आले होते.
खर्चाचा आढावा घेतल्यानंतर पुढील अर्थसंकल्पाबाबत सदस्यांनी सूचना कराव्यात, अशी सूचना सभापतींनी केली. महिला व बालकल्याण समितीकडील मार्गदर्शन शिबिरांची संख्या कमी करून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मुलींना सायकल मिळावी, यासाठी जादा निधीची तरतूद करण्याची सूचना सभापतींसह भारत शिंदे, उमेश पाटील, सचिन देशमुख आदींनी केली. आरोग्य आणि पशुसंवर्धनाबाबत जादा निधीची तरतूद करावी, अशी मागणी भारत शिंदे यांनी केली. सदस्यांनी सुचविलेल्या नावीन्यपूर्ण योजनांचा ठराव अर्थसंकल्पीय सभेत पारित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभेपूर्वी होणार पदाधिकाºयांची बैठक
- जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा मंगळवारी, २७ मार्चला होणार आहे. जिल्ह्यातील शेतकºयांची गरज आता बदलत आहे. हे ओळखून कृषी विभागाने यावर्षी आपल्या योजनांमध्ये नावीन्यपूर्ण बदल केले आहेत. फवारणीसाठी लागणारा छोटा ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर, स्पिंकलरसह इतर अनेक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. इतर विभागांनी केलेल्या सूचनांवर विचार करण्यासाठी अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्ष नव्या योजना सुरू करणार की आहे त्याच कायम ठेवणार याकडेही लक्ष असेल.
व्यक्तिगत लाभाच्या योजनेबाबत केवळ सोलापूर जिल्हा परिषदेलाच नव्हे तर सर्व जिल्हा परिषदांना अडचणीत आणल्या आहेत. या योजनेतील नियम आणि निकष लाभार्थ्यांनाच मंजूर नाहीत. शासनाचे मार्गदर्शन घेऊनच यासंदर्भातील निधीची तरतूद कमी करता येईल का याची चाचपणी करीत आहोत. पायाभूत कामे करण्यावरही पुढील वर्षभरात जोर असणार आहे.
- विजयराज डोंगरे, सभापती अर्थसमिती.