कोरोना जागृतीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे नाही निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:38 AM2020-03-11T11:38:39+5:302020-03-11T11:40:15+5:30
वाढीव निधीसाठी अध्यक्षांकडे फाईल; आजाराबाबत लोकांना नेमकी माहिती उपलब्ध करणारी पत्रके
सोलापूर : कोरोना आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे निधीच शिल्लक राहिला नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत वाढीव निधीसाठी अध्यक्षांकडे फाईल पाठविल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली.
कोरोना रुग्ण सोलापुरात आढळल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याची गंभीर दखल घेतली. व्हायरस व्हायरल झालेल्या या संदेशाबाबत भीती बाळगू नका, असे त्यांनी आवाहन केले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या बैठका घेऊन याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या. त्यानुसार महापालिका आरोग्य विभागाने जनजागृतीला सुरूवात केली. आजाराबाबत लोकांना नेमकी माहिती उपलब्ध करणारी पत्रके वाटली. पण इकडे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गेल्या चार-पाच दिवसांत फक्त फायली फिरविणेच सुरू केले आहे.
कोरोना आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना निधीची गरज आहे. हा निधी मिळेल असे जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी तालुका आरोग्य अधिकाºयांना कळविले. तालुका आरोग्य अधिकारी निधीची वाट पाहत आहेत.
पण इकडे आरोग्य विभागाकडे जनजागृतीवर खर्च घालण्यासाठी निधीच शिल्लक नाही. त्यामुळे वाढीव निधी मागण्याबाबत अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांच्याकडे फाईल पाठविण्यात आली. मागील सर्वसाधारण सभेत निधी वर्ग करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे तोंडीच सांगण्यात येत आहे. पण सभेत असा ठराव झाल्याचा उतारा न मिळाल्याने आरोग्य विभागाची ही फाईल तशीच पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना आजाराबाबत जनजागृतीचे कोणतेच प्रयोग सुरू झाले नसल्याचे दिसून येत आहे.