घरकुल बांधणीत सोलापूर जिल्हा परिषद पुणे विभागात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:30 PM2019-03-01T13:30:45+5:302019-03-01T13:32:12+5:30
सोलापूर : शासनाच्या चार योजनेंतर्गत २० हजार ४० घरकुले बांधून सोलापूर जिल्हा परिषद पुणे विभागात अव्वल ठरली आहे, अशी ...
सोलापूर : शासनाच्या चार योजनेंतर्गत २० हजार ४० घरकुले बांधून सोलापूर जिल्हा परिषद पुणे विभागात अव्वल ठरली आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी गुरूवारी दिली.
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील गरिबांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री, रमाई, शबरी आणि पारधी आवास योजना राबविल्या जात आहेत. या चारही घरकुल योजना सन २०१६-१७ मध्ये सुरू झाल्या. चार वर्षांसाठी २८ हजार ८५३ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यातील २० हजार ४० घरकुले आजमितीस पूर्ण झाली आहेत. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने घरकुल बांधणीचा आढावा घेतल्यानंतर त्यात सोलापूरचे काम अव्वल ठरले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सोलापूर जिल्ह्याला तीन वर्षांत १५ हजार ७8५ घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते. याप्रमाणे आतापर्यंत १३ हजार १५९ घरे पूर्ण झाली असून, उर्वरित घरांचे बांधकाम मार्चअखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. सन २०१६-१७ मध्ये ९ हजार ४५४ घरे मंजूर करण्यात आली, त्यातील ८६१९ घरे पूर्ण झाली आहेत. ३६0 जणांनी घरकुलाचे बांधकाम न केल्याने त्यांच्याकडून वितरित केलेल्या अनुदानाचे पैसे वसूल करण्यात आले आहेत.
सन २०१७-१८ मध्ये ४४८९ घरकुलांना मंजुरी दिली, त्यातील ३४६९ घरकुले पूर्ण झाली आहेत़ उर्वरित घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. सन २०१८-१९ मध्ये १८५२ घरकुलांना मंजुरी दिली असून, त्यातील १0७१ घरे पूर्ण झाली आहेत. येत्या महिनाभरात आणखी घरांची कामे पूर्ण झाली आहेत. घरकुलांचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी वाळूचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासला. त्यामुळे अडचणी आल्या. आता शासनाने मंजूर घरकुलांना मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे काम आणखी वेगाने होणार आहे.