सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची लॉटरी लागणार कुणाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:52 AM2019-12-31T10:52:58+5:302019-12-31T10:56:09+5:30
आज होणार फैसला; दोन्ही गटाच्या गुप्त हालचालींना आला वेग
सोलापूर : झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची लॉटरी कुणाला लागणार याकडे आज जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. झेडपीत सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी व भाजप पुरस्कृत समविचार आघाडीच्या नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे.
झेडपीत सत्ता स्थापनेसाठी दोन्ही गटाने आपले सदस्य सहलीवर पाठविले आहेत. हे सदस्य दुपारपर्यंत सोलापुरात दाखल होत आहेत. महाविकास आघाडीचे सदस्य यशवंतनगर येथील नंदादीपवर तर भाजप पुरस्कृत सदस्य गांधीनगर येथील एका मंगल कार्यालयात जमा होणार आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार यांनी लक्ष घातल्याने चुरस वाढली आहे. तर इकडे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते—पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सकाळीच रणजीतदादा आमदार देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. समविचारी आघाडीतील कोणाला अध्यक्ष व उपाध्यप करावयाचे यावर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
महाविकास आघाडीचे सदस्य नंदादीपवर थोड्याच वेळात दाखल होणार आहेत. यासाठी आमदार भारत भालके, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. आता या चुरशीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
आवताडे गटाकडे लक्ष
- मंगळवेढ्याच्या आवताडे गट कोणाकडे राहणार यावर बहुमताचा आकडा जुळणार असल्याचे सांगितले जात आहे. काही काळ समाधान आवताडे भाजपच्या गोटात चर्चा करीत होते व नंतर त्यांनी आमदार संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे. पदावरून कोणत्या गटात फायदा होईल याकडे आघाड्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज प्रत्यक्ष होणाºया निवडणुकीत कोण बाजी मारणार हाच मुद्दा चर्चेचा राहणार आहे.