सोलापूर जिल्हा परिषदेची ई-सेवा पुस्तकाची संकल्पना राज्यभर राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 07:34 PM2021-11-02T19:34:54+5:302021-11-02T19:35:00+5:30
जिल्हा परिषदेचे कौतुक: ऑनलाईन सेवेचे उद्घाटन
सोलापूर : कार्यालयीन कामकाज सुधारणा अभियानातून सोलापूर जिल्हा परिषदेने १४ हजार कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक ऑनलाइन उपलब्ध केले. ई-सेवा पुस्तकाची ही संकल्पना राज्यभर राबविण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सोमवार दिली.
जिल्हा परिषदेने डिजिटल प्लॅटफाॅर्म अंतर्गत तयार केलेल्या ई-सेवा पुस्तक प्रणालीचा शुभारंभ ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या ऑनलाइन उपस्थितीत करण्यात आला. त्यांच्यासमवेत विभागीय उपायुक्त संतोष पाटील, राहुल साखोरे, विजय मुळीक सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, इशाधीन शेळकंदे, स्मिता पाटील, डॉ. शीतलकुमार जाधव, भास्करराव बाबर, जावेद शेख उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी बार्शी पंचायत समितीला भेट दिल्यावर तेथील कर्मचारी आनंद साठे यांनी कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक स्कॅन करून पीडीएफ स्वरुपात मोबाईल ॲपवर देण्याची संकल्पना मांडली होती. त्या संकल्पनेला बळ दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध झाले. यासाठी कर्मचाऱ्यांनी सहा महिने मेहनत घेतल्याचे नमूद केले.
प्रास्ताविक चंचल पाटील यांनी केले तर शेवटी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांनी आभार मानले. यावेळी ई-सेवा पुस्तकाला मदत करणाऱ्या प्रसन्न स्वामी, हनुमंत गायकवाड, विलास मसलकर, आनंद साठे, नरेंद्र अकेले यांचा सन्मान करण्यात आला.