महिन्याला ५०० कोटींची उलाढाल असलेल्या सोलापुरी केळीला आता बंगाली मजुरांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:49 AM2020-12-11T04:49:09+5:302020-12-11T13:11:37+5:30
टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून माढा, करमाळा, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यातील सुमारे ५०० कोटींची उलाढाल असलेला केळी ...
टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून माढा, करमाळा, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यातील सुमारे ५०० कोटींची उलाढाल असलेला केळी निर्यात व्यवसाय पश्चिम बंगालमधून आलेल्या मजुरांवर अवलंबून आहे. या मजुरांची संख्या सुमारे ३ हजारांच्या आसपास आहे. ग्रीन बेल्टमधील शेतकरी आता उसाला पर्याय म्हणून केळी लागवडीकडे वळले आहेत. हमारे यहा बेरोजगारी है, इसलिए मजुरी के लिए महाराष्ट्र में आना पडता है अशा भावना मजुरांनी व्यक्त केल्या.
सात-आठ वर्षांपासून या भागातील शेतकरी केळी आखाती देशात निर्यात करीत आहे. निर्यातक्षम केळी फक्त उत्पादन करून चालत नाही तर त्यासाठी केळीच्या झाडावरून केळीचे घड कापून त्याची पॅकिंग करून कंटेनरमध्ये भरेपर्यंतची प्रक्रिया करण्यासाठी कुशल कामगारांची गरज असते. ही महत्त्वपूर्ण गरज पश्चिम बंगालमधून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या मजुरांनी पूर्ण केली आहे.
पश्चिम बंगालमधील कलकत्ता परिसरातील हे मजूर सध्या टेंभुर्णी, कंदर, करमाळा या ठिकाणी वास्तव्यास आहेत. डिसेंबर ते मे असे यांचे येथे वास्तव्य असते. मुकादमाकरवी ही यंत्रणा कार्यरत असते. एका ग्रुपमध्ये १८ ते ३० वयोगटातील १५ ते १८ तरून मजूर असतात. हे मजूर कामाच्या सोयीने छोट्या-छोट्या पत्र्याच्या खोल्या भाड्याने घेऊन वास्तव्य करतात. सकाळी ८ ते सायंकाळी ६ हे मजूर केळीच्या फडात असतात.
काय असते यांचे काम?
कापणी केलेले घड काळजीपूर्वक हाताळून घडाच्या फण्या वेगळ्या करणे, कागदी बॉक्समध्ये पॅकिंग करणे, बॉक्समधील प्लास्टिक पिशवीतील हवा काढणे ही सर्व कौशल्याची कामे बंगाली मजूर मन लावून करतात. त्यांना प्रतिटन १,५०० रुपये मजुरी मिळते. दिवसात सुमारे ८ टन केळी कापून पॅकिंग करतात. यासाठी त्यांना सरासरी ५०० ते ७०० मजुरी मिळते. एका मजुराकडे खर्च वजा जाता महिन्याला सुमारे १० हजार शिल्लक राहतात.
मेहनत का फल मिलता
हमारे पश्चिम बंगाल में कोई रोजगार ही नही है. हमारे यहा आम बहुत पैदा होता है मगर उसका निर्यात नही होती. कोई बडी बडी कंपनीयाभी नहीं है. मजुरी करने के लिए महाराष्ट्र में आना पडता है. यहाँ मेहनत का फल मिलता है, अशा शब्दात अबू ताबेल या मजुराने आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपले मजूर अनेक कारणे सांगून अचानक काम? सोडून घरी राहतात. त्यामुळे नियोजन कोलमडते. आपल्या माणसांना कमी श्रमात जादा पैसे हवे असतात. परप्रांतीय मजूर प्रामाणिकपणे काम? करतात. आपल्या मजुरांनाही त्यांचा कष्ट करण्याचा गुण घेतला पाहिजे.
-किरण डोके, केळी निर्यातदार, कंदर.