पंतप्रधान मोदींना आवडली सोलापूरची भेट, व्यवसायिकाने पाठवले 'चद्दर जॅकेट'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 04:44 PM2021-10-29T16:44:29+5:302021-10-29T16:46:08+5:30
पंतप्रधानांकडून आभार : कापड व्यावसायिक किरण यज्जांना फोन
महेश कुलकर्णी
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापुरातील कापड व्यावसायिक किरण यज्जा यांना काही दिवसांपूर्वी सोलापुरी जॅकेट पाठवले. हे जॅकेट मिळताच मंगळवारी थेट पंतप्रधानांनी यज्जा यांना काॅल करून त्यांचे आभार मानले. तसेच यापुढे आपण अधिक त्रास न घेता सांगितल्यावर जॅकेट पाठविण्याचा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला. पंतप्रधान मोदी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी सर्वप्रथम सोलापुरात आले होते. त्यावेळी येथील कापड व्यावसायिक बालाजी आणि किरण यज्जा यांनी त्यांच्यासाठी तीन जॅकेट बनवून दिली होती.
मोदी यांनी यज्जा यांनी शिवलेले जॅकेट परिधान करून सोलापूरच्या सभेत भाषण केले होते. या भाषणानंतर सोलापुरी जॅकेटची त्यांनी प्रशंसा केली होती. त्यानंतर आजपर्यंत यज्जा यांनी पंतप्रधानांना वेळोवेळी ४० जॅकेट पाठवली आहेत. ही सर्वच जॅकेट मोदी यांनी कुठल्या ना कुठल्या समारंभात परिधान केली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी यज्जा यांनी वेगवेगळ्या रंगांची आठ जॅकेट पुन्हा पंतप्रधानांना दिल्ली येथे पाठविली होती. ही जॅकेट मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी थेट किरण यज्जा यांना फोन करुन त्यांचे आभार मानले. तसेच सोलापुरी जॅकेटची प्रशंसा केली.
जब मेरा मन करेगा मै कहूंगा...
यावेळी मोदी यज्जा यांना फोनवर म्हणाले, ‘अरे भाई तुम इतना सारा सामान मत भेजा करो, मै इसको पहनताभी नही हूँ, तुम बेकार मे खर्चा करते हो... अब मेरा साईज भी बदल गया है... जरूरत पडेगी तो मै आपको जरूर कहुंगा...’ यावर किरण यज्जा यांनी मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मोदी म्हणाले, ‘एकदा जरूर भेटू.’
चद्दर जॅकेट
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे पती निक जोन्स यांनी सोलापूरच्या चादरीचा पोषाख परिधान केल्याच्या छायाचित्राची देशभर चर्चा झाली होती. याच प्रकारचे सोलापुरी चद्दर जॅकेट यज्जा यांनी पंतप्रधानांना पाठविले आहे.
थेट पंतप्रधानांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर मी आश्चर्यचकीत झालो. सुरुवातीला पंतप्रधानांचे पीएस दीपक जोशी बोलले. त्यांनी पंतप्रधान बोलणार असल्याचे सांगितले. क्षणभर माझा स्वत:वर विश्वास बसला नाही. यानंतर पंतप्रधान स्वत: बोलल्यानंतर एवढ्या मोठ्या माणसाशी बोलल्याचा मला प्रचंड आनंद झाला.
- किरण यज्जा, कापड व्यावसायिक.