रेल्वे स्टेशनवर मिळतील सोलापुरी चादरी; सोबत कडक भाकऱ्या अन् शेंगा चटणीही
By रूपेश हेळवे | Published: May 2, 2024 08:19 PM2024-05-02T20:19:45+5:302024-05-02T20:20:10+5:30
शेंगा चटणी अन् कडक भाकऱ्याही मिळत असल्याने प्रवाशांना चांगली संधी साधून आली आहे.
रुपेश हेळवे, सोलापूर: मध्य रेल्वेच्या ‘वन स्टेशन-वन प्रॉडक्ट’ या योजनेअंतर्गत सोलापुरी चादरींना नव्याने मार्केट मिळाले असून, प्रवाशांकडून चांगलीच मागणी होत आहे. स्थानिक उत्पादनाला वाव मिळतोय. यासाठी सोलापुरातील उत्पादकांसाठी नव्याने संधी चालून आली आहे. शेंगा चटणी अन् कडक भाकऱ्याही मिळत असल्याने प्रवाशांना चांगली संधी साधून आली आहे.
या योजनेमुळे देशातील विविध ठिकाणी प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना देशात असणाऱ्या विविध संस्कृतीचा समृद्ध वारसा अनुभवण्यास मिळत आहे. शिवाय समाजातील उपेक्षित घटकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी यामुळे निर्माण झाल्या आहेत. या योजनेच्या उत्पादनांचे वेगवेगळ्या श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणाची खाद्य संस्कृती, वेशभूषा, राहणीमान, कापड संस्कृती, हस्तकला, कलाकृती, स्थानिक कृषी उत्पादने, प्रक्रिया केलेले, अर्ध-प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा समावेश करण्यात आला आहे.
‘एक स्टेशन एक उत्पादन’ स्टॉल मिळविण्याची अर्ज प्रक्रिया अर्जदाराला आपला अर्ज संबंधित स्टेशन मास्टर यांच्याकडे आपला दाखल करता येईल. नवीन अर्जदाराला दर १५ दिवसांनी एक स्टॉल दिला जाईल. त्यासाठी अर्जदाराला फक्त १००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तरी रेल्वे प्रवाशांनी आणि नागरिकांनी रेल्वे स्थानकावरील ‘एक स्टेशन एक उत्पादन’ या स्टॉलला भेट देऊन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केले.