ग्रामविकास विभाग राबवणार सोलापुरी 'सायकल बँक' पॅटर्न
By शीतलकुमार कांबळे | Published: July 1, 2023 01:05 PM2023-07-01T13:05:09+5:302023-07-01T13:05:29+5:30
मंत्री गिरीश महाजनांचा पुढाकार : मुलींना मिळणार सायकल
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद राबवित असलेला सायकल बँकेचा उपक्रमाची ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेतली आहे. सायकल बँक पॅटर्न हा ग्रामविकास विभाग राज्यभर राबविणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सोलापूर मुलींसाठी सुरू केलेली सायकल बँक प्रेरणादायी आहे. ग्रामविकास विभाग मुलींसाठी सायकल बँक सुरू करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणार अशी माहिती ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील दहा मुलींना १० सायकलचे वाटप ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.
काय आहे सायकल बँक उपक्रम
दिलीप स्वामी यांनी शासनाचा निधी न वापरता स्वत लोकवर्गणी व अधिकारी व कर्मचारी व विविध संस्थांची मदत घेऊन जिल्ह्यात २८८० सायकलींचे वाटप केले. हा नाविण्यपूर्ण उपक्रम मुलींच्या शिक्षणासाठी दिशादर्शक ठरला. यामुळे शाळेपासून दूर राहत असलेल्या २८८० मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या.