अभिमानास्पद; सोलापुरी उद्योजक देणार जगाला डिजिटल मार्केटिंगचे धडे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 12:49 PM2020-05-09T12:49:33+5:302020-05-09T12:53:08+5:30
देश-विदेशातील २० हजार व्यापाºयांना मार्गदर्शन; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन आव्हानांचा सामना
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : सामूहिकपणे डिजिटल मार्केटिंगचा फंडा अंमलात आणा. असे केल्यास मार्केटिंग खर्च वाचेल आणि जगभरातील व्यापारी त्वरित आकर्षित होतील. हा प्रयोग सोलापुरातील रेडिमेड गारमेंट असोसिएशनने अंमलात आणला. डिजिटल मार्केटिंगच्या संकल्पनेतून सोलापूरसारख्या थ्री टायर सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शन भरविले आणि यास देशभरातील पंधरा हजारांहून अधिक तसेच जगभरातील शेकडो व्यापारी, एजंट, उद्योजक सहभागी झाले. प्रदर्शन खºया अर्थाने यशस्वी होऊन यातून जागतिक व्यापारी व्यासपीठ सोलापुरातील उद्योजकांना उपलब्ध झाली. सोलापुरी गारमेंट उद्योगातील डिजिटल मार्केटिंग फंडा आता जागतिक पातळीवर चर्चिला जाणार आहे.
सोलापुरातील प्रसिद्ध गारमेंट उद्योजक अमित जैन हे या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपनी अलीबाबा डॉटकॉमच्या व्यासपीठावर अनुभव शेअर करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलीबाबा डॉटकॉम कंपनीने जगभरातील उद्योजकांना पुढील आव्हाने कसे असतील या विषयावर विचार मागवले. ‘अलीबाबा स्पीच’ या उपक्रमांतर्गत अमित जैन यांनी सोलापुरातील गारमेंट असोसिएशनने केलेल्या डिजिटल मार्केटिंगबद्दल अनुभव शेअर केले. या अनुभवाची दखल अलीबाबा डॉटकॉमने घेतली आहे. १८ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता अलीबाबा डॉटकॉमकडून इंटरनॅशनल वेबिनार होणार आहे. या वेबिनारमध्ये अमित जैन हे दहा मिनिटे देशभरातील तब्बल वीस हजार व्यापारी, उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.
डिजिटल मार्केटिंगमधून देश आणि विदेशातील व्यापाºयांना कसे आकर्षित करता येईल यावर अमित जैन मार्गदर्शन करणार आहेत. यास मेक इन इंडियाची जोड असणार आहे. आंतरराष्ट्रीय वेबिनार मार्गदर्शन करण्यासाठी भारतातून फक्त दोन उद्योजकांची निवड करण्यात आली आहे. सोलापुरातून अमित जैन यांची निवड झाली आहे. ही गोष्ट सोलापूरसाठी मोठी अभिमानाची आहे. संपूर्ण भारताच्या औद्योगिक व्यासपीठावर सोलापूरच्या डिजिटल मार्केटिंगची चर्चा या वेबिनारच्या माध्यमातून होणार आहे. जैन यांच्या निवडीने सोलापुरातील उद्योजकांनी आनंद व्यक्त केला आहे.
सोलापुरातच रोजगार मिळावा म्हणून...
- अमित छगनलाल जैन यांचे एमबीए शिक्षण झाले आहे. भारती विद्यापीठातून त्यांनी एमबीएची पदवी घेतली असून, मागील नऊ वर्षांपासून गारमेंट उद्योगात आहेत. दोन वर्षे त्यांनी पुण्यात देखील नोकरी केली. नोकरीत त्यांचे मन रमले नाही. सोलापुरातून इतरत्र स्थलांतरित होणाºया युवकांना सोलापुरातच रोजगार मिळेल या दृष्टीने त्यांनी वडिलांच्या गारमेंट व्यवसायात उडी घेतली. अल्पावधीतच गारमेंट उद्योग वाढीस लावला. स्कूल युनिफॉर्म हब संकल्पना पहिल्यांदा त्यांच्या पुढाकारातून पुढे आली. अमित जैन यांच्या सहकारी उद्योजकांनी सोलापुरात आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला. सोलापुरात दोनदा, पुण्यात आणि मुंबईत प्रत्येकी एकदा असे एकूण चार वेळा सोलापूर गारमेंट असोसिएशनने आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शन भरवले. त्यास जागतिक पातळीवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.