सोलापुरी शड्डू; हत्तूरच्या लाल मातीने घडविले हंडे तालमीचे मल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 01:09 PM2018-12-04T13:09:06+5:302018-12-04T13:10:37+5:30
महेश कुलकर्णी सोलापूर : तालीम म्हटले की, कुस्तीचा फड आणि त्यातील लाल माती समोर येते. विशिष्ट प्रकारची ही माती ...
महेश कुलकर्णी
सोलापूर : तालीम म्हटले की, कुस्तीचा फड आणि त्यातील लाल माती समोर येते. विशिष्ट प्रकारची ही माती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मिळते. वारद चाळीतील हंडे तालमीच्या आखाड्यात असणारी ही माती मात्र तिथली नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूरवरून आणलेल्या या मातीने हंडे तालमीतील अनेक पैलवान घडविले आहेत. सध्या इतर तालमींप्रमाणेच इथेही व्यायाम करणाºयांची संख्या कमी झाली आहे.
रामलाल चौकातील वारद चाळ. नरसिंग गिरजी आणि जाम मिलमधील बहुतांश कामगार या चाळीत राहतात. १९३० च्या सुमारास ही चाळ कै. आप्पासाहेब वारद यांनी बांधली. गिरणी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या तालमींपैकी ही एक तालीम. १९३५ साली हंडे पैलवान यांनी या तालमीची उभारणी केली. यावेळी नरसू खलिपा जंगलप्पा सद्दल हे तालमीचे खलिपा होते. शहरातील इतर तालमींच्या पैलवानांबरोबर येथे कुस्त्या लावण्यात येत होत्या. सद्दल यांच्यानंतर गोविंद नाईकवाडी पैलवान यांनी या तालमीचे नाव उज्ज्वल केले. मुंबई येथे झालेल्या महाराष्टÑ केसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी विजेतेपद मिळविले.
यानंतर संगप्पा बिराजदार, प्रल्हाद गायकवाड, हुसेनप्पा सद्दल, बसलिंग पैलवान यांनी अनेक कुस्त्या गाजविल्या. बसलिंग पैलवान यांनी १९६० च्या दरम्यान सांगली येथे हिंद केसरी मारुती माने यांच्याबरोबरची कुस्ती मारली होती. कोल्हापूर येथे झालेल्या हिंद केसरी स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदविला होता. सध्या या तालमीचे वस्ताद म्हणून ७२ वर्षीय अंबालाल कोळी काम पाहत आहेत तर खलिपा म्हणून जंगलप्पा म्याकल हे काम पाहत आहेत.
८४ वर्षे जुन्या तालमीच्या नोंदणीसाठी उपनिबंधकांकडे अर्ज केलेला आहे मात्र अद्याप त्यांनी तालमीची नोंद केली नसल्याची खंत कोळी यांनी व्यक्त केली. नगरसेवक चेतन नरोटे यांनी दीड लाखांची मदत केली.
शहरातील पत्रा तालीम, साठे तालीम, लष्कर तालीम, साईबाबा तालीम यांचा हंडे तालमीशी मिलाफ होता. सर्व तालमींशी चर्चा करून येथे कुस्त्या लावल्या जात होत्या. आजही तालीम पहाटे ५.३० वाजता सुरू करण्यात येते, तर सायंकाळी बरोबर ४ वाजता चाळीतील मुले येथे कसरत करण्यासाठी येतात.
समाजकल्याण केंद्राची मदत
च्गिरणी कामगारांसाठी असणाºया हंडे तालमीला रामलाल चौकातील समाजकल्याण केंद्राकडून पूर्वी मदत मिळायची. व्यायामाचे साहित्य आणि तालमीच्या देखभालीचा मासिक खर्च शासनाकडून दिला जात होता. यामुळे काही दिवस या तालमीचे नाव समाजकल्याण केंद्र तालीम म्हणूनही ठेवण्यात आले होते. नंतर ही मदत बंद झाली.
कुस्तीसारख्या मर्दानी खेळाला जिवंत ठेवण्यासाठी आजही आम्ही प्रयत्न करीत आहोत. याची दखल कोणीच घेत नाही. मोजक्या तालमी महाराष्टÑात शिल्लक आहेत. या तालमीचे वस्ताद आणि खलिपा यांनी संपूर्ण आयुष्य या क्षेत्रासाठी वाहून घेतलेले आहे. अशा लोकांना शासनाने ठराविक मानधन द्यावे.
- अंबालाल कोळी,
वस्ताद, हंडे तालीम, वारद चाळ.
तालमीच्या देखभालीसाठी मासिक दोन हजार रुपये खर्च येतो. शहरातील सर्वच गिरण्या बंद पडल्यामुळे मिल कामगार हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही वर्गणी गोळा करून ही तालीम सुरू ठेवली आहे. शासनाने मासिक रकमेच्या स्वरूपात तालमीला आर्थिक मदत करावी.
- जंगलप्पा म्याकल,
खलिपा, हंडे तालीम, वारद चाळ.