सोलापुरी शड्डू ; पंजाब तालमीला जीर्णोद्धाराची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:31 AM2018-11-23T10:31:09+5:302018-11-23T10:33:24+5:30

सव्वाशे वर्षांपूर्वीचा आखाडा : जगप्रसिद्ध भोला, गामा, हमीदा पैलवानांनी खेळल्या कुस्त्या

Solapuri Shaddu; Waiting for revitalization of Punjab | सोलापुरी शड्डू ; पंजाब तालमीला जीर्णोद्धाराची प्रतीक्षा

सोलापुरी शड्डू ; पंजाब तालमीला जीर्णोद्धाराची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वात जुनी तालीम म्हणून ओळख असलेली उत्तर कसब्यातील पंजाब तालीम१८८० च्या दशकात स्थापन झालेला खूप मोठा सोनेरी इतिहासजगप्रसिद्ध भोला, गामा, हमीदा, अस्लम पैलवानांनी याठिकाणी कुस्त्या खेळल्या

महेश कुलकर्णी । 

सोलापूर : गिरण्यांचे शहर म्हणून सोलापूर जसे प्रसिद्ध होते तसेच तालमींचे शहर अशी ओळखदेखील इथली होती. एक से एक जुन्या तालमी शहरात आहेत. यापैकी सर्वात जुनी तालीम म्हणून ओळख असलेली उत्तर कसब्यातील पंजाब तालीम होय. १८८० च्या दशकात स्थापन झालेला खूप मोठा सोनेरी इतिहास आहे.  जगप्रसिद्ध भोला, गामा, हमीदा, अस्लम पैलवानांनी याठिकाणी कुस्त्या खेळल्या आहेत. सध्या मात्र ही तालीम निधीअभावी जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे.

सुरुवातीला उत्तर कसबा असे या तालमीचे नाव होते. या तालमीत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील प्रसिद्ध पैलवान पीर बक्श पंजाबी हे सोलापूरला कुस्ती खेळण्यासाठी यायचे.  वर्षातून दोनवेळा येणाºया या पंजाबी पैलवानांची ख्याती सर्वदूर होती.  त्यांच्या सततच्या येण्यामुळे या तालमीला पंजाब तालीम असे नाव पडले. पापामियाँ वस्ताद, अल्लाउद्दीन खलिफा, अमीनसाब मुतवल्ली, हाजी वजीरोद्दीन उस्ताद, सुलेमान मास्तर, हाजूमियाँ शेख, करीमसाब सौदागर, शफी पैलवान, लक्ष्मण गवळी या दिग्गज कुस्तीगिरांनी पंजाब तालमीच्या लौकिकात भर घातली. या प्रसिद्ध तालमीबरोबरच या भागातील मुस्लीम बांधव आणि देशभरातील मुस्लीम मल्लांना नमाज पढण्यासाठी याच ठिकाणी मशीद उभी करण्यात आली. कसब्यातील दानशूर कै. भीमाशंकर अळ्ळे (थोबडे) हे कुस्तीशौकिन होते. फाळणीपूर्वी येणाºया मोठमोठ्या पैलवानांची खुराकाची व्यवस्था ते करायचे. एवढेच नव्हे तर कुस्ती जिंकणाºया पैलवानांना बक्षीस म्हणून त्यांनी जमिनीही दिल्या आहेत.

१९५८ नंतर जैनोद्दीन शेख, अजीज पापामियाँ, ख्वाजाभाई खलिफा, अब्बास मास्तर, गफार वस्ताद या मंडळींनी पंजाब तालमीला कुस्तीच्या क्षेत्रात अग्रेसर ठेवण्याची भूमिका पार पाडली. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान पंडित नेहरू सोलापूरला आल्यानंतर त्यांनी उत्तर कसब्यातील दिल्लीपर्यंत प्रसिद्ध असलेल्या पंजाब तालमीला भेट दिली. त्यावेळी तालमीचे प्रमुख करीमसाहेब सौदागर यांनी त्यांचा सत्कार केला होता.

सध्याच्या परिस्थितीत कुस्तीचा शौक कमी झाला असला तरी आजदेखील ही तालीम आहे तशीच आहे. या परिसरातील १०-१५ मुले सायंकाळी येथे व्यायाम करतात. तालमीवरचे पत्रे जीर्ण झाल्यामुळे पावसाचे पाणी येथे गळते. यामुळे सध्या या तालमीतील कुस्तीच्या हौदातील माती काढून टाकण्यात आली आहे. जुन्या तालमीच्या ढाच्याला धक्का न लावता नवी तालीम बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी लवकरच काम सुरू करण्यात येणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. सध्या तालमीचे वस्ताद म्हणून हाजी अब्दुल गफूर खलिफा म्हणून हाजी इस्माईल काम पाहत आहेत.

मिलाफ तालीम !
च्सोलापुरातील पहिलीच तालीम पंजाब तालीम असल्याचा दावा तालमीचे वस्ताद अब्दुल गफार यांनी केला आहे. सर्व समाजाच्या तालमींना एकत्र आणून त्यांचे नेतृत्व करण्याचे काम या तालमीने केलेले आहे. सिद्धेश्वर तालीम, गुलाब तालीम, ब्राह्मण तालीम, पापय्या तालीम, रामवाडी तालीम या सर्व तालमीत समन्वय ठेवण्याचे काम पंजाब तालमीने केल्यामुळे ‘मिलाफ तालीम’ असेही या तालमीला म्हटले जाते. जुनी मिलचे मालक नरोत्तमदास मोरारका हेही कुस्तीशौकिन होते. त्यांनी पंजाब तालमीला परदेशातून आणलेल्या लोखंडाच्या चार पिलरसह इतर साहित्य भेट दिले. 

माझे वडील, आजोबा या तालमीचे वस्ताद होते. एकेकाळी सुवर्णकाळ पाहिलेल्या तालमीचा मी सध्या वस्ताद आहे, याचा मला अभिमान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याची प्रेरणा कुस्तीच्या खेळामुळे भारतीयांना मिळाली. या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.
- हाजी अब्दुल गफार,
वस्ताद, पंजाब तालीम


तालमीची देखभाल करण्याचा मान आमच्या घराण्याकडे आहे. वडील, आजोबा यांनी त्यावेळी तालमीला देशात अव्वल ठेवण्यासाठी प्रयत्न केले. आता काळ बदलला आहे. जीमचा जमाना आला आहे. नव्या काळाप्रमाणे तालमीची रचना करण्यासाठी सर्व विश्वस्तांशी चर्चा करून कार्यक्रम आखला आहे.
- हाजी इस्माईल खलिफा
पंजाब तालीम.

तालमीचा मूळ ढांचा न बदलता नवीन इमारत बांधण्याचे आम्ही ठरविले असून यासाठी निधीची आवश्यकता आहे. महापालिका, प्रभागातील नगरसेवक आणि शासनाने ऐतिहासिक तालमीच्या अस्तित्वासाठी आर्थिक मदत देऊन सहकार्य केल्यास नवी इमारत उभी करून कुस्ती आणि जिम असे वेगवेगळे भाग करू.
- राजू हुंडेकरी,
विश्वस्त, पंजाब तालीम.

Web Title: Solapuri Shaddu; Waiting for revitalization of Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.