सोलापुरी शड्डु ; आप्पा तालमीनं दिली स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:14 AM2018-11-19T10:14:50+5:302018-11-19T10:16:08+5:30
लाठी-काठीचा सरावही चालायचा : लोकमान्य टिळकांनी दिली होती भेट
सोलापूर : सोलापुरात स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा भवानी पेठेतील आप्पा तालीममध्ये मिळायची. तालमीत येणारे युवा कुस्तीपटू लाठी-काठीचा सराव करायचे. त्यातील काही जण पुढे स्वातंत्र्य चळवळीत उतरले. लोकमान्य टिळक यांनी या तालमीला भेट दिल्याचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आजही या तालमीतून देशभक्तीची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
१९३१-३२ साली तालीम बांधण्यात आली. माजी आमदार स्व. बाबुराव चाकोते, स्व. शंकरेप्पा धनशेट्टी, माजी उपमहापौर स्व. यल्लप्पा जेनुरे, त्यावेळचे तालीम संघाचे अध्यक्ष स्व. शंकर रॉय, स्व. इब्राहिम अल्लोळी, जनसंघाचे माजी अध्यक्ष स्व. अॅड. हणमंतप्पा राचेटी, स्व. बद्रिनाथ तापडिया, स्व. बसप्पा तोनशाळ ही मंडळी तालमीत यायचे. तालमीतील धडे गिरवता-गिरवता त्यांच्यात स्वातंत्र्य चळवळीवर चर्चा व्हायची.
वेळप्रसंगी ब्रिटिशांबरोबर सामना करण्याचा प्रसंग आला तर या तालमीत लाठी-काठींचा सराव व्हायचा. देशप्रेम जागृत करणारी तालीम म्हणूनही आप्पा तालीमचे नाव आजही घेतले जाते. शिवाय मंगळवेढा तालीम, मद्रासी तालीम (मोमीन समाज) या तालमींना निधी देऊन त्यांचेही सुशोभिकरण केल्याचे त्यांनी सांगितले. आज काळ बदलला. जिमच्या जमान्यात तालमीकडे येणाºयांची संख्या घटू लागली. असे असतानाही आजही आप्पा तालमीत दररोज सकाळ-संध्याकाळी ४०-५० मुले येत असल्याचे चाकोते यांनी आवर्जून सांगितले.
लिंगैक्य मृत्यूंजय महास्वामी तालमीत यायचे !
च्भवानी पेठेतील श्री किरीटेश्वर मठाचे मठाधिपती लिंगैक्य पूज्य श्री मृत्यूंजय महास्वामी सकाळी आणि सायंकाळी आपल्या काही शिष्यांसह तालमीत यायचे. किरीटेश्वर मठातील त्यावेळच्या युवा पिढींना ते घराबाहेर काढायचे. कोण येत नसतील तर त्यांना प्रेमाने जवळ बोलवायचे आणि थेट तालमीत नेऊन तेथे धडे द्यायचे. मृत्यूंजय महास्वामी आणि स्वामी तालीम (आताचे आप्पा तालीम) असे एक समीकरणच बनले होते. आजही ही तालीम मृत्यूंजय महास्वामीजींच्या आठवणींना उजाळा देते आहे.
मीही वडील तथा माजी आमदार बाबुराव चाकोते यांच्याबरोबर तालमीत जायचो. कुस्तीचे अनेक धडे आपण गिरवले आहेत. म्हणूनच १९७४ साली मला बालकेसरी पुरस्कार मिळाला. युवा पिढी तालमीकडे वळावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
-विश्वनाथ चाकोते
माजी आमदार