सोलापूरकरांना आता गँगवार नकोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:20 PM2018-07-09T12:20:41+5:302018-07-09T12:22:23+5:30
आबा कांबळे खूनप्रकरण : सूडभाव कमी करण्यासाठी पुढाकार हवा
रवींद्र देशमुख
सोलापूर : मोबाईल गल्लीत (डाळिंबी आड, शिंदे चौक) शनिवारी रात्री झालेल्या सत्यवान उर्फ आबा कांबळेचा खून सूडभावातून झाला असल्याचे फिर्यादीवरून स्पष्ट झाल्यानंतर या खूनप्रकरणाचे पडसाद शहरात पुन्हा गँगवार उफाळून येण्यात होण्याची भीती व्यक्त होत असून, टोळीयुद्धाला कोणत्याही प्रकारचे खतपाणी मिळू नये, यासाठी पोलिसांनीच जबाबदारी उचलण्याची गरज आहे. दोन्ही टोळ्यांमधील सूडभाव कमी करण्यासाठीही राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढे येण्याची गरज आहे,अशी भावना आज शांतताप्रेमी सोलापूरकरांमध्ये व्यक्त झाली.
कांबळे याचा निर्घृण खून झाल्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीमध्ये ऋतुराज शिंदे खून प्रकरणाचा संदर्भ देऊन त्याचा सूड घेण्यासाठीच सत्यवान उर्फ आबा याचा खून झाल्याचे नमूद करण्यात आले होते. ऋतुराज खून खटल्यात आबा कांबळे आरोपी होता. उच्च न्यायालयातून तो निर्दोष मुक्त झाला होता. त्यानंतर त्याने चरितार्थासाठी मोबाईल गल्लीत दुकान सुरू केले होते. शुभम श्रीकांत धुळराव (वय २३, रा. १४०/१४१ उत्तर कसबा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टोळीयुद्धातील खुनाचा बदला घेण्यासाठीच कांबळे याचा खून झाल्याचे स्पष्ट होते; मात्र वस्तुस्थिती पोलिसांच्या तपासातच स्पष्ट होणार आहे; मात्र धुळराव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांना तपासाची एक निश्चित दिशा मिळणार आहे. त्यानुसार रविराज शिंदे, गामा पैलवान (सुरेश शिंदे) व त्यांच्या साथीदारांना अटकही करण्यात आली आहे.
सोलापुरात १९९२ साली पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली. त्यानंतर शहरात शांतता प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली; पण त्यापूर्वी पाच-सात वर्षे या शहराला गँगवारने ग्रासले होते. आयुक्तालय सुरू होण्यापूर्वी शहरात चार टोळ्या सक्रिय होत्या. शहराच्या गावठाण भागात राहणाºया शहरवासीयांनी अनेकदा या टोळ्यांमधील रस्त्यावरचा संघर्ष पाहिलेलाही आहे. चौपाड, माळी गल्ली आणि एसटी स्टँड परिसरातील अगदी एकमेकांच्या शेजारी असणाºया दोन टोळ्यांमध्ये मात्र कट्टर दुश्मनी होती. तिसरी टोळी या दोन्ही टोळ्यांपेक्षा अधिक व्यापक होती. शहरातील जुने वाडे विकत घेणे, तेथील भाडेकरुंना हुसकावून लावणे किंवा एखाद्या मिळकतदाराच्या जागेतील भाडेकरू पैसे घेऊन काढून देणे, अशा गैरकृत्याच्या माध्यमातून या तिन्ही टोळ्यांनी बक्कळ माया कमविली होती. या तिन्ही टोळ्यांच्या दुश्मनीमध्ये अनेक गुंडांचे शहराच्या मध्यवर्ती भागात खून झाले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चौथी टोळी मात्र फारशी सक्रिय नव्हती; पण त्यांची दत्त चौक, राजवाडे चौक, लक्ष्मी मंडई परिसरात दहशत होती.
आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर मात्र पोलीस यंत्रणेने या टोळ्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली. टोळ्यांमधील गुंडांवर खटले भरण्यात आले काहींना शिक्षा झाल्या काही निर्दोष बाहेर आले; पण पोलिसांचा वचक असल्यामुळे तिन्ही टोळ्यातील गुंडांनी टोळीयुद्ध थांबवून स्वत:चे व्यवसाय थाटले काहीजण राजकारणात सक्रिय झाले.
सन २००२ मध्ये ऋतुराज शिंदे या तरुण युवकाचा खून झाल्यानंतर सुडाचा भाव उघडपणे व्यक्त केला होता. मधल्या काळात या खुनावरून संबंधित दोन टोळ्यांमध्ये किरकोळ धुसफूसही झाली; पण अखेर या सुडभावाचे पर्यवसान सत्यवान उर्फ आबा कांबळेच्या खुनात झाल्यामुळेच शहरात टोळीयुद्धाला पुन्हा चालना मिळते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच पोलिसांनी अधिक सावध पवित्रा घेऊन शहराला पुन्हा टोळीयुध्दाचा कलंक लागू नये, यासाठी कारवाई केली पाहिजे, अशीही सोलापूरकरांची आग्रही भूमिका आहे.
विकासाला खीळ नको!
सोलापूर शहराला विकासाची गरज आहे. शहरातील बेरोजगारी कमी करण्यासाठी नवीन उद्योग-व्यवसाय सुरू होणे गरजेचे आहे; पण यासाठी शहरात शांतता नांदली पाहिजे. १९९२ पूर्वीच्या टोळीयुद्धामुळे शहर बदनाम झाले होते. त्यावेळी सुरू असणाºया कापड गिरण्यांमध्येही या टोळीयुद्धाची दहशत होती. त्यामुळे नवीन व्यवसाय - उद्योग सुरू होण्यात अडथळा निर्माण झाला होता. आता पुन्हा टोळीयुद्धाची भीती नागरिक व्यक्त करीत असतील तर ती रोखण्यासाठी पोलिसांबरोबरच राजकीय आणि सामाजिक नेत्यांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. टोळ्यांमधील सूडभाव संपुष्टात आणण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे, अशा भावना व्यक्त करून अनेक शहरवासीयांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर आता विकासाला खीळ नको, अशी आग्रही भूमिका घेतली आहे.