सोलापूरकरांनो; बसा घरात अन्यथा पोलीस ठाण्यात निघेल वरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:24 AM2020-03-24T11:24:19+5:302020-03-24T11:28:20+5:30
विनाकारण घराबाहेर पडणाºयांवर पोलीसांकडून कारवाई सुरू; शहरात कलम १४४ नुसार संचारबंदी लागू
सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार शहरात कलम १४४ नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विनाकारण घराच्या बाहेर पडणाºयांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येत आहे़ शहरातील चौकाचौकात पोलीस थांबलेले असून विनाकारण शहरात फिरणाºयांवर कडक कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डिसेंबर २0१९ पासून चीन देशातील वुहान शहरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अनेक रूग्ण मृत्युमुखी पडलेले आहेत. कोरोना विषाणूमुळे इटली, जपान, इराण, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, अमेरिका आदी देशांत मोठ्या प्रमाणात लोक कोरोनाबाधित झाले आहेत. बरेच लोक मृत्युमुखी पडले आहेत.
महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. सोलापूर शहरात विषाणूचा प्रसार होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. रूग्ण राज्यातून व देशातून महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशावरून शहरात सी.आर.पी.सी. कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
संचारबंदीच्या काळात दूध, भाजीपाला, किराणा दुकान, मेडिकल, हॉस्पिटल, अन्नधान्य मालवाहतूक, मीडिया, इलेक्ट्रीसिटी आदींना सुट देण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, विनाकारण घराच्या बाहेर पडून कायद्याचा भंग करू नये. रिक्षा, बस, एस.टी. आदी सर्वप्रकारची दुकाने बंद करण्यात आली आहेत. नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई केली जाईल. स्वत:बरोबर दुसºयांची काळजी घ्या, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.
चोख पोलीस बदोबस्त
आंतरजिल्हा व राज्य सीमेवरती स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिकचा पोलीस फोर्स नाकाबंदीच्या ठिकाणी पाठवला जाईल असेही पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले़