योगशास्त्रात पदव्यूत्तर पदवी घेऊन सोलापूरकर युवक बनले आरोग्यदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 05:34 PM2022-06-21T17:34:18+5:302022-06-21T17:34:21+5:30
सोलापूर विद्यापीठात अभ्यासक्रम : जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये देताहेत महत्त्वाची सेवा
सोलापूर : योगाचे महत्त्व जाणून अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या एम. ए. योगा ही पदवी घेऊन विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये योगाचे धडे देत आहेत. या अभ्यासक्रमातून युवकांना एक रोजगार मिळाला असून, योगाचा प्रसार अन् प्रचार करण्यात ही युवा मंडळी अग्रेसर असल्याचे चित्र जागतिक योग दिनाच्या पूर्वसंध्येला पााहावयास मिळाले.
कौशल्य विकास योजनेंतर्गत विद्यापीठात योगा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर अभियंते, डॉक्टर, वकील तसेच उद्योजकसुद्धा योगा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत आहेत. आतापर्यंत २४० जणांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. २०१८ मध्ये योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम सुरू झाले. मागच्या वर्षी एमए योगा अभ्यासक्रम सुरू झाले. एमए अभ्यासक्रम फक्त राज्यात नागपूर आणि पुणे विद्यापीठात सुरू होते. आता सोलापूर विद्यापीठात योगा अभ्यासक्रम सुरू झाल्याने परप्रांतातील युवकही अभ्यासक्रमासाठी सोलापूर विद्यापीठात येत आहेत.
पार्ट टाइम अभ्यासक्रम
योगाचे महत्त्व ओळखून कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विद्यापीठात योगा अभ्यासक्रम सुरू झाले. अभ्यासक्रम पार्ट टाइम असून, दर शनिवारी आणि रविवारी दोन दिवस अभ्यासक्रमात चालतो. सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी सहा ते आठ या दोन सत्रात अभ्यासक्रम चालतो. डिप्लोमासाठी ६० जागा आणि एमएसाठी ३० जागा असून, डिप्लोमासाठी ८ हजार आणि एमएसाठी १६ हजार रुपये फी आहे.
योगामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य चांगले राहते. मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच हृदयविकार या आजारापासून दूर राहण्यास मदत करते. पूर्वी फक्त व्यायामासाठी योगाचा वापर व्हायचा. आता योगाचे बहुउपयोगी फायदे असल्यामुळे अनेक युवक योगाचे प्रशिक्षण घ्यायला विद्यापीठात येत आहेत. केंद्र सरकार योगा संबंधित रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करीत आहे. त्यामुळे युवकदेखील याकडे आकर्षित होत आहेत.
डॉ. अभिजित जगताप, समन्वयक : आरोग्य विज्ञान संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ