सोलापूरकर पडले तिरुपती लाडूच्या प्रेमात; दररोज चार हजार सोलापूरकर घेतात बालाजीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 12:24 PM2021-07-02T12:24:06+5:302021-07-02T12:24:13+5:30
लाडूंचे अनलिमिटेड वाटप असल्यामुळे सोलापूरकर आणतात बक्कळ प्रसाद
सोलापूर : तिरुपती येथील भगवान ‘बालाजी’च्या दर्शनाकरिता सोलापूरकर मोठ्या संख्येने जाताहेत. सध्या भक्तांची रेलचेल कमी असल्यामुळे ‘बालाजी’चे दर्शन निवांत होत आहे. जगप्रसिद्ध ‘तिरुपती लाडू’ही आता सर्वांना हवे तेवढे मिळत आहेत. सोलापूरकर तिरुपती लाडूच्या पूर्वीपासूनच प्रेमात आहेत. दर्शन घेतल्यानंतर भक्तांना अनलिमिटेड लाडू मिळत असल्याने सोलापूरकर प्रत्येक जण तब्बल शंभर- दीडशे लाडू आणताहेत.
सोलापुरात आल्यानंतर भगवान बालाजीचा प्रसाद म्हणून आपल्या मित्र परिवारांना मोठ्या श्रद्धेने वाटत आहेत. अक्कलकोट रोड येथील एका यंत्रमाग उद्योजकाने तिरुपतीचे तब्बल दीडशे लाडू आणले. त्यांच्या कारखान्यातील सर्व कामगारांना लाडू वाटले. तसेच अशोक चौक सराफ कट्ट्यातील एका सराफ व्यावसायिकांनी १०० लाडू आणून त्यांच्या मित्र परिवारातील सर्वांना वाटले. यासोबत असे अनेक नागरिक आहेत जे ५० ते ८० पर्यंत लाडू आणत आहेत.
दरम्यान, रोज दोन ते तीन हजार सोलापूरकर ‘बालाजी’च्या दर्शनाकरिता तिरुपतीला जात आहेत. मागील दोन महिन्यांत तब्बल अडीच लाखांहून अधिक सोलापूरकरांनी बालाजीचे दर्शन घेतले. कोरोनामुळे तिरुमला तिरुपती देवस्थानकडून रोज पंधरा ते वीस हजार भक्तांनाच दर्शनाची परवानगी आहे. त्यामुळे दर्शन रांगेत गर्दी नाही. अवघ्या काही मिनिटांत दर्शन होत आहे. याचा फायदा सोलापूरकर घेत आहेत. दर्शनाला जाण्यापूर्वी ऑनलाइन दर्शन बुकिंग करणे गरजेचे आहे. ऑफलाइन तिकीट विक्री बंद आहे. सार्वजनिक मोफत धर्मदर्शनदेखील बंद आहे. त्यामुळे दर्शनाला गेलेल्या भक्तांना अवघ्या अर्ध्या तासात दर्शन होत आहे. पूर्वी सात ते आठ तास लागायचे.
लाडूचे वजन १७५ ग्रॅम
अत्यंत स्वादिष्ट, सुगंधित आणि चविष्ट असलेल्या तिरुपती लाडूला २००९ साली जिऑग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळाला आहे. पूर्वी १० रुपयांना एक लाडू मिळायचा. त्यानंतर लाडूच्या दरात वाढ होत राहिली. आता १७५ ग्रॅम लाडूकरिता ५० रुपये किंमत आहे. यासोबत दोनशे रुपये किमतीचाही लाडू विक्रीकरिता उपलब्ध आहे. पूर्वी दर्शन घेतलेल्या भक्ताला एक लाडू मोफत मिळायचा. त्यासोबत चार लाडू खरेदी करता येत असे. आता प्रत्येक भक्ताला कितीही लाडू खरेदी करता येत आहेत. कोरोनामुळे भक्तांची संख्या कमी झाली. लाडू शिल्लक राहत आहेत. त्यामुळे अनलिमिटेड लाडू खरेदीचे अधिकार भक्तांना दिलेला आहे. याचा सर्वाधिक फायदा सोलापूरकर घेत आहेत.