आली दिवाळी; आधुनिकपेक्षा जुन्याच केरसुणीला मानतात सोलापूरकर लक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 12:30 PM2020-11-07T12:30:15+5:302020-11-07T12:35:14+5:30

सोलापूर शहरात दररोज बनतात ७ ते ८ हजार केरसुणी, दिवाळीतील उलाढाल अधिक

Solapurkar Lakshmi considers Kersuni to be older than modern | आली दिवाळी; आधुनिकपेक्षा जुन्याच केरसुणीला मानतात सोलापूरकर लक्ष्मी

आली दिवाळी; आधुनिकपेक्षा जुन्याच केरसुणीला मानतात सोलापूरकर लक्ष्मी

googlenewsNext
ठळक मुद्देदिवाळीच्या लक्ष्मीपूजनात महत्त्वाचा भाग म्हणून केरसुणीची पूजा केली जातेशुक्रवार पेठ, जुना बोरामणी नाका परिसरात सुमारे दीडशे लोक केरसुणी बनवून आपल्या कुटुंबाची गुजराण करतात

सोलापूर : दिवाळीला प्रत्येक मराठी माणसाच्या घरात केरसुणी लक्ष्मी म्हणून पुजण्याची महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आजदेखील घराघरांत पाळली जाते. लोकांच्या घरामध्ये पुजल्या जाणाऱ्या लक्ष्मीची ज्या घरामध्ये निर्मिती होते तेथील लोक सध्या दिवाळीनिमित्त केरसुणी तयारीच्या कामात मग्न आहेत. सोलापूर शहरात दिवसाला ७ ते ८ हजार केरसुणी तयार होत असल्याचे सांगण्यात आले.

दिवाळी सणामध्येच केरसुणी बनविण्याचा व्यवसाय चालतो. या कालावधीमध्ये दिवसाला एका महिलेकडून ७० ते ८० केरसुण्या बांधल्या जातात. तसे पाहता दिवसभरात साधारण ७ ते ८ हजार केरसुण्या बांधून तयार होतात. यातून मिळणारा मोबदला मात्र किरकोळच असतो. सोलापूर शहरात केरसुणी ३० ते ५० रुपयांना विकली जाते, तर आधुनिक झाडूची किंमत ८० ते १२० रुपयांच्या घरात आहे. केरसुणीच्या या किमतीला देखील ग्राहकांकडून घासाघीस केली जाते. त्या विक्रीतून गरज भागेल इतकासुद्धा आर्थिक लाभ होत नसल्याचे गंगुबाई जाधव यांनी सांगितले.

तरीदेखील परिस्थितीशी दोन हात सुरूच

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात महत्त्वाचा भाग म्हणून केरसुणीची पूजा केली जाते. शुक्रवार पेठ, जुना बोरामणी नाका परिसरात सुमारे दीडशे लोक केरसुणी बनवून आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. याच पैशातून मुलाबाळांना नवीन कपडे,, घरातलं आजारपण, लोकांची देणी, असा प्रपंच चालविला जातो. यात दिवाळी सण सोडला तर इतर दिवशी घरातील मिळेल ते काम करतात. तरीदेखील परिस्थितीशी दोन हात सुरूच असतात.

--------------

अशी बनविली जाते केरसुणी

शिंदीच्या झाडाच्या फडेचे भारे विकत आणून, त्याला बडवून चार दिवस वाळविले जाते. वाळल्यानंतर त्याची मुडगी तयार करून नायलाॅन दोरीच्या साहाय्याने मुडगीला बांधले जाते. दरम्यान, मूठ तयार होईल तसतशी मुडगी उकलत उकलत केरसुणी फुलविली जाते. दोऱ्याने पक्की मूठ बांधल्यानंतर फुललेल्या केरसुणीला शिलाईच्या साहाय्याने छिलल्यामुळे केरसुणी बारीक बारीक काड्यांची तयार होते.

आठवडा बाजार, गल्लोगल्ली हिंडून विक्री करून आमचे कुुटुंब चालवितो. रोज एक बाई तीस ते चाळीस केरसुणी बांधते. साधारण तीस ते पन्नास रुपयांपर्यंत भाव मिळतो. गौरी-गणपती व दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात केरसुणीला महत्त्व असल्याने लोक आवर्जून घेतात. त्यामुळे आमचाही सण चांगला जातो.

- गंगुबाई जाधव, केरसुणी विक्रेत्या, सोलापूर  

Web Title: Solapurkar Lakshmi considers Kersuni to be older than modern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.