सोलापूरकरांकडून खूप प्रेम मिळाले; ‘घरकूल’मध्ये अव्वल राहिल्याचा आनंद - राजेंद्र भारूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:29 PM2019-07-23T13:29:05+5:302019-07-23T13:34:51+5:30
‘लोकमत’ भवनाला सदिच्छा भेट; प्रकाश वायचळ यांचीही उपस्थिती
सोलापूर : सोलापूरकरांनी खूप प्रेम दिले़ अनेक आठवणीही दिल्या़ सोलापूरच्या सहकाºयांकडूनही अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या़ चांगल्या सहकार्यामुळेच स्वच्छ भारत अभियानात उमा भारतींच्या हस्ते सत्कार झाला़ प्रधानमंत्री घरकूल योजनेच्या कामांत राज्यात अग्रेसर राहिलो, याचा आनंद तर खूप आहे, पण सोबतच गटारमुक्त गाव, प्रत्येक अंगणवाडीत बेबी टॉयलेट करण्याची माझी संकल्पना अपुरी राहिली, अशी खंत सोलापूरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सध्याचे नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ़राजेंद्र भारू ड यांनी व्यक्त केली़
डॉ़ राजेंद्र भारूड यांची नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांच्या जागी प्रकाश वायचळ यांची सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे़ यानिमित्त दोघांनीही ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली, यावेळी डॉ. भारूड बोलत होते़
डॉ़ भारूड पुढे म्हणाले, आपली शाळा सर्वांत चांगली आहे हे दाखविण्यासाठी प्रत्येक शाळा-शाळांमध्ये स्पर्धा लागाव्यात म्हणून आदर्श शाळा पुरस्कार प्रकल्प हाती घेतला होता़ यासाठी दीडशे गुणांची थीम बनवली होती़ याचबरोबर प्रत्येक अंगणवाडीत गॅस सिलिंडर असावे, बेबी टॉयलेट असावे, सर्व गावे गटारमुक्त करावीत ही माझी इच्छा होती, पण या सर्व इच्छा नवीन सीईओ वायचळ साहेब पूर्ण करतील़
सोलापूरबद्दल बोलताना डॉ़ भारूड पुढे म्हणाले, सोलापूर जिल्हा मला नवीन होता़. सोलापुरात असलेल्या ३९ साखर कारखान्यांबद्दल मी ऐकून होतो़ पण येथे आल्यानंतर सोलापूरकरांच्या प्रेमाची मला जाणीव झाली़
येथे काम करत असताना मला खूप आनंद झाला़ सर्वसामान्य व्यक्तीच्या अपेक्षा खूप कमी असतात़ त्यांची दैनंदिन कामे वेळेवर व्हावीत, ग्रामसेवक, कर्मचारी वेळेवर उपलब्ध असावेत, एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते़ ग्रामीण भागात मी जेथे जेथे गेलो तेथील सर्वांनी मला प्रेम दिले़
स्वच्छ भारत अभियानातून उमा भारती यांच्या हस्ते झालेला सत्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुखातून घरकूल कामांसंबंधी झालेले कौतुक, रेकॉर्ड रुम मॉडेल मला आठवणीत राहणारे आहे़ लोक किती भावनिक असतात, हे मला त्या एका फोटोमुळे (सांगोल्यातील) झालेल्या वादामुळे कळाले़ ही घटना झाली तरी मी आपल्या कामात कधीही खंड पडू दिला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले़
यावेळी वायचळ म्हणाले, माझ्या करिअरची सुरूवात उस्मानाबाद येथूनच झाली होती. २ मार्च १९९६ मध्ये त्यावेळेला उस्मानाबादच्या शेजारचे एकमेव शहर होते ते सोलापूऱ इथे अनेक आवश्यक गोष्टी आम्हाला मिळत नव्हत्या़ ते आम्ही सोलापुरातून घेऊन जात होतो. तेव्हापासून मला सोलापूरची ओळख आहे. तेव्हापेक्षा सोलापुरात आजची परिस्थिती खूपच चांगली आहे. सोलापूर मिळाले आहे हे जेव्हा मला कळले खूपच चांगले वाटले. यापुढे मी पूर्णवेळ सोलापूरकरांची सेवा करेन सोबतच भारूड साहेबांचे उर्वरित काम मी पूर्ण करेन, असे मत त्यांनी व्यक्त केले़
योजना गतीने राबविल्या!
- दोन वर्षांपूर्वी डॉ. भारूड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतला. शासनाच्या अनेक योजना त्यांनी जलदगतीने राबविल्या़ प्रधानमंत्री घरकूल योजनेचे काम राज्यात अग्रेसर ठेवले. गटारमुक्त गाव करण्यासाठी शोषखड्डे घेण्याचा पथदर्शी प्रकल्प त्यांनी सोलापूर जिल्ह्यात राबविला़ या प्रकल्पाची केंद्रस्तरावरून दखल घेण्यात आली. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण विभागातील अनेक प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे राबविले. याचबरोबर आषाढी वारीतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा उपक्रम कौतुकास्पद ठरला़ यासाठी त्यांची नाशिक येथील कुंभमेळाव्याच्या अभ्यासासाठी निवड झाली होती़