Janata Curfew; सोलापूरकरांचा स्वयं कर्फ्यू; सर्वच रस्ते सामसूम...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 10:24 AM2020-03-22T10:24:30+5:302020-03-22T10:32:02+5:30
‘कोरोना’विरूद्धचा लढा यशस्वी होतोय़़़; एन्ट्री पॉर्इंटवर पोलिसांचा बंदोबस्त
सोलापूर: कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी व देशातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी रविवार दि. २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात नागरिक स्वयंस्फूर्तीने कर्फ्यू पाळत आहेत. चला तर मग कोरोनाविरुद्ध हा लढा यशस्वी करू या असा नारा प्रत्येक सोलापूरकर देत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत.
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही याचा फैलाव होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात आढळलेल्या संशयित रुग्णांवरून कोरोना विषाणू प्रादुर्भावाची साखळी खंडित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. २२ मार्च रोजी एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात यावा असे आवाहन केले आहे.
या आवाहनाला सोलापूरकर १०० टक्के प्रतिसाद देत आहेत. कोरोना विषाणूचे गांभीर्य पाहता या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक संघटना, संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सोलापुरात कोरोना संशयित १४ रुग्ण आढळले. प्रशासनाने वेगाने हालचाली करून प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. यातील १३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. परदेश व मुंबई, पुणे व इतर राज्यातून परत आलेल्या रहिवाशांच्या संसर्गामुळे ही साखळी वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू यशस्वी करण्याबाबत आवाहन केले आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. सध्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने, शॉपिंग मॉल्स, पान टपरी, हॉटेल्स उघडण्यावर ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे शनिवारी शहरातील वर्दळ कमी झाल्याचे दिसून आले. लोक अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी बाहेर पडले व खरेदी आटोपल्यानंतर लागलीच घरी परतल्याचे दिसून आले. भाजीपाला, दूध व इतर किराणा साहित्याचा साठा करून नागरिक निवांत झाले आहेत. रविवारी कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडायचे नाही असा निर्धार नागरिकांमध्ये दिसून आला.
कर्फ्यू म्हणजे काय
- जनता कर्फ्यूबाबत सगळीकडेच चर्चा आहे. कायदा व सुव्यवस्था राबविण्यासाठी पोलिसांनी राबविलेला कर्फ्यू सोलापूरकरांच्या कायम लक्षात आहे. त्याच धर्तीवर आता सोलापुरातील नागरिक स्वयंस्फूर्तीने कर्फ्यू पाळणार आहेत. कोरोनाच्या विषाणूला पळवून लावण्यासाठी विनाकारण कोणीही रस्त्यावर येणार नाही असा निर्धार सर्वांनीच केल्याचे दिसून येत आहे. पण या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. रुग्णांना दवाखान्यात ये-जा करता येईल व त्यांच्यासाठी लागणारी औषधे खरेदी करता येण्यासाठी मेडिकल, पेट्रोलपंप सुरू राहतील. महामार्गावरील वाहतूक सुरू असेल. कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही.
कोरोनाचा प्रतिबंध व प्रसार रोखण्यासाठी रविवारी पुकारण्यात आलेला जनता कर्फ्यू सर्वांनी उत्स्फूर्तपणे पाळावा. या काळात पोलिसांचा कायदेशीर धाक असणार नाही. पण या अनुषंगाने जे आदेश देण्यात आलेले आहेत, त्याच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा कार्यरत राहणार आहे. प्रशासनाला नागरिकांनी मदत करावी
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी
एन्ट्री पॉर्इंटवर राहणार पोलिसांचा बंदोबस्त
- केंद्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या जनतेच्या कर्फ्यूदरम्यान शहराच्या एन्ट्री पॉर्इंटवर शहर पोलीस आयुक्तालयाचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रमुख चौकातही पोलीस तैनात राहणार असून, दिवसभर सर्वत्र पेट्रोलिंग होणार आहे.
- हैदराबाद रोड, पुणे रोड, मंगळवेढा रोड, विजापूर रोड, तुळजापूर रोड, होटगी रोड, अक्कलकोट रोड आदी शहरात येणाºया प्रत्येक रोडच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.