सोलापूरकरांनो, महाग होण्याअगोदरच खरेदी करा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 12:50 PM2021-01-01T12:50:10+5:302021-01-01T12:50:18+5:30
सेडाचे आवाहन : नव्या वर्षात एलईडी, फ्रीज, कुलर, वाशिंग मशीन महागणार
सोलापूर : कोरोनामुळे दिवाळी, दसरा यासारख्या सणासुदीच्या काळात तुम्ही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारख्या वस्तू खरेदी केल्या नसतील तर आता नव्या वर्षात खरेदी करणं महागात पडू शकतं. कारण अनेक कंपन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. पुढच्या महिन्यात सामान्यांच्या उपयोगाच्या वस्तूंचे दर जवळपास ८ ते १० टक्के वाढणार असल्याचे संकेत विविध कंपन्या देत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महाग होण्यापूर्वीच अगदी कमी किमतीत सोलापूरसारख्या स्थानिक बाजारपेेठेतून खरेदी करा, असे आवाहन सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनच्या वतीने सेक्रेटरी आनंद येमुल यांनी केले आहे.
जानेवारी महिन्यात इलेक्ट्राॅनिक्सच्या वस्तू ८ ते १० टक्क्यांनी महाग होणार आहेत. तत्पूर्वी सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी नववर्ष, मकर संक्रांतीचे औचित्य साधून आता सद्य:स्थितीत आहे त्या किमतीत स्थानिक बाजारपेठेतूनच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करून आपला आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहन सेडाच्या वतीने करण्यात आले आहे. लॉकडाऊनकाळात कंपन्या बंद होत्या, त्यामुळे देशभरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा पुरवठा कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महाग होणार आहेत.
सध्या एलईडी, फ्रीज, कुलर, वाशिंग मशीन, मोबाइल, लॅपटॉप, आरओ प्युअरिफायर यासह इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन व होम अप्लायन्सेसच्या अत्याधुनिक वस्तू स्थानिक बाजारपेठेत कमी किमतीत मिळू शकणार असल्याचेही सेडाच्या वतीने सांगण्यात आले. या संधीचा फायदा ग्राहकांना होणार आहे, त्यामुळे महाग होण्यापूर्वीच वस्तू खरेदी करून आनंद लुटा, असे आवाहन सेडाच्या वतीने करण्यात आले आहे.