सोलापूरकरांनो रेल्वेने कोठेही जा.. नो वेटिंग; कोरोनामुळे प्रवासी संख्येत घट
By appasaheb.patil | Published: March 25, 2021 03:30 PM2021-03-25T15:30:57+5:302021-03-25T15:41:05+5:30
परीक्षेसाठी व कामानिमित्त जाणाऱ्याची संख्या अधिक
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचा परिणाम आता रेल्वेच्या प्रवासावर दिसून येत आहे. सोलापूर विभागातून कोणत्याही मेल, एक्स्प्रेस, पॅसेजर गाडीने प्रवास करा.. तिकीट बुक होतेच... सीट बुकिंगसाठी वेटिंग करावे लागत नाही. कोरोनामुळे प्रवासी संख्येत किंचित घट झाली असली तरी परीक्षेसाठी व कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या रेल्वेसाठी समाधानकारक आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही शहर व जिल्ह्यात लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे, संचारबंदी व अन्य कडक निर्बंधाचे पाऊल काही शहरांनी उचलले आहे. शिवाय काही शहरांनी शहर प्रवेशासाठी कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे, त्यामुळे या शहरातून त्या शहरात किंवा या राज्यातून त्या राज्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे.
रोज ३२ एक्स्प्रेस धावतात...
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून दररोज मुंबई, पुणे, हैदराबाद आदी विविध प्रमुख मार्गांवर ३२ मेल, एक्स्प्रेस, पॅसेजर गाड्या धावतात. यातील उद्यान, सिद्धेश्वर, कर्नाटक, हुसेनसागर, हैदराबाद, कोणार्क एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांची संख्या चांगली आहे. पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली असली तरी परीक्षा, कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून रेल्वेने प्रवास करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
परीक्षेनंतर रेल्वेचे आरक्षण होईल वेटिंग...
एप्रिलनंतर म्हणजे मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. दरवर्षी उन्हाळ्यात एप्रिल, मे, जून महिन्यातील रेल्वेचे आरक्षण वेटिंगवर असते. मात्र यंदा कोरोनामुळे अशी स्थिती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. मात्र परीक्षेनंतर निश्चितच रेल्वेचे आरक्षण वेटिंगवर जाईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
मुंबई, पुण्याला जाण्यासाठी वेटिंग
सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) भारतीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), बँका, रेल्वे व अन्य विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील भरतीसाठीच्या परीक्षा चालू आहेत. शिवाय कामानिमित्त सोलापूर विभागातून मुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या अधिक दिसून येत आहे. कोरोनामुळे रेल्वेत आरक्षित तिकीट असणाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे कधी कधी मुंबई, पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना वेटिंगचा सामना करावा लागत आहे.
कोरोनामुळे सध्या विशेष एक्स्प्रेस धावतात. रेल्वेची प्रवासी सेवा रूळावर येत आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या सर्व नियमांच्या अधीन राहून रेल्वे प्रशासन काम करीत आहे. कोरोनाची स्थिती पाहता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या समाधानकारक आहे. रेल्वेला हवे तेवढे प्रवासी मिळत आहेत.
-प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर मंडल