Survey News, सोलापूरकरांना मस्का आवडतो.. मास्क नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 11:54 AM2020-07-08T11:54:41+5:302020-07-08T12:02:21+5:30
का तोंड झाकत नाहीत ही मंडळी; ‘लोकमत’ टीमनं खोदून खोदून विचारलं, तेव्हा मिळाली धक्कादायक उत्तरं
सोलापूर : लई भारी सोलापुरी..या म्हणीची पुन्हा एकदा आठवण यावी, असे किस्से सोलापूरकरांच्या मास्कबाबतीत घडू लागलेत. इडली-वड्यासोबत मोठ्या आवडीनं ‘मस्का’ खाणाºया सोलापूरकरांना रस्त्यावर फिरताना मात्र ‘मास्क’ वापरायला आवडत नाही, हेच स्पष्ट होऊ लागले. ‘मास्क’ न वापरणाºया मंडळींना चौका-चौकात थांबवून ‘लोकमत’ टीमनं त्याची कारणं विचारली. तेव्हा एक वाक्य ऐकायला मिळाले.
सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतोय. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामागील प्रमुख कारणांचा आढावा घेतला असता त्यात प्रमुख कारण मास्क न वापरणे हे आढळून आले आहे. दम लागतोय अन् डोकंही दुखतंय, यामुळे ही कारणं आहेत मास्क न वापरणाºयांची. काही महाभाग हौस म्हणून की काय गळ्यात मास्क अडकावून रस्त्यांवरून फिरत असतात.
शहरातील बहुतांश हद्दवाढ भागात वापरणाºयांचे प्रमाण खूपच कमी आहे. याउलट अपार्टमेंट्स, कॉलनीमध्ये मास्क मोठ्या प्रमाणात वापरतात. याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर व्यक्तीनुसार तसेच त्यांच्या वयानुसार असे त्रास होत असतात, असे सांगितले. पण दिवसभर एकच मास्क वापरणे धोकादायक आहे. त्यामुळे दिवसभर २ ते ३ मास्क वापरणे गरजेचे आहे. अनेक तास वापरल्यानंतर शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे श्वास घ्यायला अडचण निर्माण होतो. दम लागत असेल तर घरात जाऊन पाच मिनिटे किंवा जास्तीत जास्त दहा मिनिटे मास्क बाजूला ठेवून रिफ्रेश होणे गरजेचे आहे.
कापडी मास्क स्वच्छ करत राहा..
जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओ अभ्यासानुसार थुंकी विसर्जनाद्वारे रोगजंतू बाहेर पडतात. पुन्हा हे जंतू हवेतून नाकाद्वारे जाऊ नयेत, याकरिता मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. मास्क न घालता बाहेर फिरणे १००% धोकादायक आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरा. मास्क अनेक प्रकारचे आहेत. मास्क एन-९५, फिल्टर मास्क, कापडी फिल्टर मास्क, सिंगल लेअर तसेच थ्री लेअर प्रकारचे मास्क वापरणे सुरक्षित आहे. कापडी मास्क स्वच्छ करत राहा.