सोलापूरकरांनो.. लस न घेतलेल्या लोकांपासून सर्वधिक धोका; स्वत:चे आराेग्य वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2022 01:24 PM2022-01-23T13:24:41+5:302022-01-23T13:25:06+5:30
सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख लोकांनी अजून घेतली नाही लस
सोलापूर : कोरोनाबरोबर खेळू नका. अद्याप पाच लाख जणांनी लस घेतली नाही. त्यामुळे कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी व कुटुंब आणि गाव सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने लस घ्या असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी दिलीप स्वामी यांनी शनिवारी येेथे बोलताना केले.
मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे ‘ मी सुरक्षित.. माझे गाव सुरक्षित ’ या अभियानाचा शुभारंभ सीईओ स्वामी यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच विजया ताकमोगे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी जगताप, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , ग्रामसेविका ए. एस. भालशंकर, मुख्याध्यापक साबळे, डाॅ. पाथरूडकर उपस्थित होते. सीईओ स्वामी यांनी कोरोनामुळे आरोग्याचे काय नुकसान याचा अनुभव घेतल्याचे सांगितले. ठणठणीत असलेले लोक कोरोनाने मरण पावल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे वेळीच धोका ओळखा व लस घ्या. ज्यांनी अजूनही लस घेतलेली नाही अशा व्यक्तीपासून गावाला धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांचा शोध घेऊन लस घ्यायला भाग पाडा. अद्याप पाच लाख लोकांनी एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या मोहिमेला सहकार्य करा असे आवाहन केले.
शिक्षणाकडे दिले लक्ष
कोरोनामुळे शाळा बंद होत्या. दुसऱ्या लाटेनंतर सीईओंनी पारावरच्या शाळा सुरू केल्याने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक साबळे यांनी दिली. उपसरपंच सौदागर साठे यांनी लोकवर्गणीतून पावणेसात लाखांची कामे केल्याचे सांगितले.