सोलापूरकरांनो विमानाने मुंबई, दिल्लीला जायचंय.. मग कर्नाटकचा रस्ता धरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:08 PM2020-07-21T12:08:59+5:302020-07-21T12:10:38+5:30
उद्योजकांमध्ये नाराजी; सोलापूर आधी विजापुरात होतेय आंतरराष्ट्रीय विमानतळ
सोलापूर : शहरातून कमी वेळात मुंबई, दिल्लीला जायचंय...तर मग आधी विजयपूरला जावं लागेल. कारण सोलापूरच्या मागून विजापुरात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ९५ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, २०२२ मध्ये हे विमानतळ सुरु होणार आहे. सोलापुरातील उद्योगवाढीसाठी विमानतळ गरजेचे असताना ते होत नसल्याबद्दल उद्योजकांत नाराजी आहे.
उद्योजक तसेच इतरांच्या प्रयत्नामुळे किंगफिशरची विमानसेवा सुरू झाली. काही काळानंतर ही सेवा बंद झाली. केंद्र सरकारच्या उडान योजनेत सोलापूरचा तीनदा सहभाग झाला, पण प्रत्यक्षात विमानसेवा सुरू झालीच नाही. साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा देखील आला.
विमान उतरण्यासाठी व उड्डाण करण्यासाठी दोन्ही बाजू रिकाम्या असाव्या लागतात. नेमका हाच अडथळा येत असल्याचे विमानतळ सल्लागार समितीचे माजी सदस्य केतन शहा यांनी सांगितले.
विजापूर येथील विमानतळासाठी कर्नाटक शासनाने २२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. विजापूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर मदभावी आणि बुºहाणपूर या परिसरात ७२७ एकर जमीन हस्तांतरण करण्यात आली आहे.
२०२२ मध्ये विमानतळ सुरू झाल्यास दुबई, मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, तिरुपती, चेन्नई या देशांतर्गत व परदेशातून विमानसेवा शक्य होईल. यामुळे सोलापूरकरांना आता स्वत:ची विमानसेवा ऐवजी विजापूरच्या विमानसेवेवर अवलंबून रहावे लागणार आहे.
होटगी रोडची सेवा असावी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेतली होती. सोलापूरच्या बोरामणी येथील विमानतळासाठी ५० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी पाच महिन्यांपूर्वी सांगितले होते. या विषयी मी चौकशी केली असता पैसे तर दूर राहिले त्या बैठकीचे मिनिटस्देखील कोणत्याच खात्याकडे नाहीत. बोरामणी येथे विमानतळ होईल तेव्हा होईल तोपर्यंत होटगी रोड विमानतळावरुन विमान सेवा चालू करायला हवी, असे विमानतळ सल्लागार समितीचे माजी सदस्य केतन शहा यांनी सांगितले.
सोलापूर हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात होते. येथे योग्य सेवा, सुविधा नसल्याने शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही. तसे पाहायला गेलो तर सोलापुरात विमानसेवा खूप आधीपासून सुरू व्हायला हवी होती, पण तसे होताना दिसत नाही. यापुढे तरी लवकर विमानसेवा शहरात सुरू व्हावी, शहराची प्रगती व्हावी अशी अपेक्षा बाळगू या.
- राजेश गोसकी,
अध्यक्ष, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन.