तोकडे कपडे घालणाऱ्या सोलापूरकरांना सतरा मंदिरांमध्ये प्रवेश नाही; महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती
By बाळकृष्ण दोड्डी | Published: June 11, 2023 07:38 PM2023-06-11T19:38:55+5:302023-06-11T19:39:10+5:30
शहरातील सतरा मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू केल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाने रविवारी दिली आहे.
सोलापूर : शहरातील सतरा मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू केल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाने रविवारी दिली आहे. त्यामुळे यापुढे तोकडे कपडे घालून मंदिरात येणाऱ्या भक्तांना सतरा मंदिरांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. जीन्स व टी शर्ट घालून येणाऱ्या भक्तांना प्रवेश मिळेल. परंतू, फाटलेली जीन्स किंवा स्कर्ट घालून येणाऱ्या युवतींना मंदिरात प्रवेश मिळणार नसल्याची माहिती महासंघाने दिली आहे.
श्री हिंगुलांबिका मंदिरात महासंघाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा तसेच मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी वस्त्रसंहिता लागू केली आहे. याबाबत मंदिराबाहेर वस्त्रसंहितेचा फलक लावून भक्तांना सूचित करू, अशी माहिती यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य राजन बुणगे यांनी पत्रकारांना दिली.
या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू
श्री हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्ट, विजय नगर येथील श्री गणेश मंदिर देवस्थान, पूर्वभागातील श्रीराम मंदीर, श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम्, अक्कलकोट रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिर, श्री वैष्णव मारुती मित्रमंडळ संचलित देवस्थान, गीता मंदिर देवस्थान, श्री शनि मंदिर, जुने दत्त मंदीर, श्री मश्रुम गणपती मंदिर, भद्रावती पेठेतील श्री साईबाबा मंदिर, श्री काळा मारूती मंदिर, जोडबसवण्णा चौकातील श्री मारूती मंदिर, मजरेवाडी येथील श्री नागनाथ मंदिर.