सोलापूरकरांनाही मिळणार कोरोना लस; पिनकोडवर ठरणार लसीकरणाचे बूथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 01:08 PM2021-01-02T13:08:15+5:302021-01-02T13:20:08+5:30
आरोग्य विभागाची तयारी : फ्रंटलाईनच्या कर्मचाऱ्यांची होणार नोंद
सोलापूर : कोरोना लसीकरणाची राज्यातील चार जिल्ह्यात रंगीत तालीम होणार असली तरी इतर सर्वत्र ठिकाणी लसीकरणाची तयारी जोरात सुरू आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंद केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्त्यावरील पिनकोडवरून लसीकरणाचे बूथ निश्चित होणार आहेत.
आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार लसीकरण कार्यक्रमासाठी लागणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मोहीम सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी व खासगी आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन आहे. याप्रमाणे सर्व संस्थांकडून संबंधित कर्मचारी डॉक्टरांची नावे आधार कार्डसह घेऊन ऑनलाईन नोंदण्यात आली आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांच्या पत्त्यावरील पिनकोडवरून बुथची मांडणी केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले. त्याप्रमाणे नोंद केलेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरणावेळेस मोबाईलवर बुथक्रमांकासह संदेश दिला जाईल. लसीकरणाला आल्यावर तीच व्यक्ती आहे की नाही, याची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे.
बुथच्या रचनेत सुटसुटीतपणा
लसीकरणानंतर संबंधिताला त्या केंद्रावर अर्धा तास थांबावे लागणार आहे. त्यामुळे एका बूथवर दररोज शंभर लसीकरण करण्याचे नियोजन आहे. लसीकरणानंतर अर्धा तास वेटिंग करण्यासाठी खास कक्ष व अॅम्बुलन्स तयार ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे या लसीकरणालाही मतदान केंद्राप्रमाणेच शाळांची निवड केली जाणार आहे.
फ्रंटलाईनवरील कर्मचारी
आरोग्य विभागानंतर आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर कोरोना उपाययोजनेसाठी फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पोलीस, सफाई कर्मचारी व वर्तमान पत्रात काम करणाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ व्यक्तिंचा टप्पा असणार आहे.