राज्याच्या ऊस गाळपात सोलापूरचा २० टक्के वाटा, ३० कारखान्यांचे गाळप ९४ लाख मे.टन, राज्यात १८२ साखर कारखाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:22 PM2018-01-22T14:22:53+5:302018-01-22T14:23:50+5:30
राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याने ऊस गाळपात आघाडी घेतली असून, राज्याच्या ४९७ लाख मेट्रिक टन गाळपात सोलापूरचा ९४ लाख मे. टन इतका हिस्सा आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २२ : राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याने ऊस गाळपात आघाडी घेतली असून, राज्याच्या ४९७ लाख मेट्रिक टन गाळपात सोलापूरचा ९४ लाख मे. टन इतका हिस्सा आहे. राज्यात सध्या १८२ साखर कारखान्यांचे पूर्ण क्षमतेने गाळप सुरू आहे.
राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध आहे. यामुळे जवळपास सर्वच महसूल विभागातील साखर कारखाने नोव्हेंबरपासूनच सुरू झाले आहेत. सात विभागात १८२ साखर कारखाने सुरू असून, १८ जानेवारीपर्यंत ४९६ लाख ८३ हजार मे.टन ऊस गाळप झाले होते. यातून ५२२ लाख क्विंटलद्वारे ९२ हजार पोती साखर तयार झाली आहे. गाळपात सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतली असली तरी उताºयात कोल्हापूर जिल्हा प्रथम आहे. कोल्हापूरच्या हेमरस कारखान्याचा उतारा १३ टक्केच्या पुढे गेला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचा उतारा ११ टक्केपेक्षा अधिक आहे. सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील एखादा कारखाना वगळता सर्वच कारखान्यांचा साखर उतारा १० ते १२ टक्के दरम्यान आहे.
सोलापूर जिल्ह्यात सध्या ३० साखर कारखान्यांचे गाळप सुरू असून, कोल्हापूरचे २२, सांगली १५, सातारा १४ व पुणे जिल्ह्यात १७ साखर कारखाने सुरू आहेत. कोल्हापूरप्रमाणे अहमदनगरचे २२ कारखाने सुरू असले तरी ऊस गाळपात कोल्हापूर आघाडीवर आहे. कोल्हापूरचे गाळप ७८ लाख ५७ हजार तर अहमदनगरचे गाळप ६३ लाख ९५ हजार मे.टन झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांच्या ९३ लाख ५९ हजार मे.टन गाळपातून ९४ लाख ९६ हजार क्विंटल साखर तयार झाली आहे.
----------------------------
खासगी कारखाने उताºयात मागे
- सोलापूर जिल्ह्यातील गाळप सुरू असलेल्या ३० पैकी सहकारी १७ साखर कारखान्यांचा उतारा १० टक्केपेक्षा पुढे आहे. पांडुरंगचा उतारा सर्वाधिक ११.०४ टक्के असून, सहकार महर्षीचा उतारा १०.९५ टक्के आहे. विठ्ठलराव शिंदे, विठ्ठल पंढरपूर, भीमा टाकळी, संत दामाजी, लोकनेते बाबुरावआण्णा पाटील, सासवड माळी शुगर, लोकमंगल अॅग्रो बीबीदारफळ, विठ्ठल कॉर्पोरेशन, जकराया शुगर, सीताराम महाराज खर्डी, युटोपियन शुगर, गोकुळ शुगर, बबनराव शिंदे, जयहिंद व शिवरत्न आलेगाव या कारखान्यांचा साखर उतारा १० टक्केपेक्षा अधिक आहे.
- विठ्ठल रिफायनरी करमाळा, भैरवनाथ लवंगी, फॅबटेक, मातोश्री शुगर, भैरवनाथ विहाळ, इंद्रेश्वर, सिद्धनाथ शुगर, लोकमंगल भंडारकवठे, कूर्मदास, मकाई, चंद्रभागा, आदिनाथ व सिद्धेश्वर कारखान्याचा उतारा ८ ते १० टक्के दरम्यान आहे.
- सोलापूरच्या सहकारी ११ पैकी पाच तर खासगी १९ पैकी ८ कारखाने साखर उताºयात मागे आहेत. सहकारी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.३१ तर खासगीचा १० टक्के इतका आहे.