Maharashtra Cabinet Expansion: ठाकरे मंत्रीमंडळ विस्तारात सोलापूरच्या पदरी निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 01:06 PM2019-12-30T13:06:07+5:302019-12-30T13:07:39+5:30
कार्यकर्ते झाले नाराज; राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला एकही पद नाही
सोलापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळ विस्तारात महाविकास आघाडीतील सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे.
महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातील कोणाला स्थान मिळणार याची सोलापूर जिल्ह्याला एक आठवड्यापासून उत्सुकता लागून राहिली होती. गेल्या दोन दिवसात सुरू असलेल्या चर्चेत काँग्रेसच्या कोट्यातून शहर मध्यच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे आणि शिवसेनेच्या कोट्यातून परांड्याचे आमदार तानाजी सावंत यांचा मंत्रीमंडळात समावेश होईल असे सांगितले जात होते. पण सोमवारी सकाळी राज्यपालांना सादर झालेली यादी प्रसिद्ध झाल्यावर सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराचा समावेश नसल्याचे दिसून आले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली.
पंढरपूरचे आमदार भारत भालके यांना विधानसभेचे उपाध्यक्ष पद मिळणार अशीही चर्चा होती, पण याबाबतही अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारात पश्चिम महाराष्ट्रात फक्त सोलापूरकरांनाच आनंदापासून मुकावे लागत आहे ही सध्याची स्थिती आहे.