सोलापूरच्या प्रसिद्ध केळी, सफरचंद, डाळिंब अन् माशांना दिल्लीच्या बाजारात भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 11:21 AM2020-12-01T11:21:09+5:302020-12-01T11:22:40+5:30
किसान रेलचा शेतकऱ्यांना फायदा - ६५ फेऱ्यातून रेल्वेला मिळाले ४.५ कोटींचे उत्पन्न, रेल्वे मंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कौतुक
सोलापूर: सोलापूरच्या फळपिकांना आता परराज्यासह जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी येऊ लागली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून आतापर्यंत ६५ किसान रेल्वे फेऱ्यातून रेल्वेला ४.५ कोटींचे उत्पन्न मिळाल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सोलापूर विभागातून किसान रेलला मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विट करून कौतुक केले आहे.
बंगळुरु-आदर्शनगर (दिल्ली) किसान स्पेशल सुरुवातीला मिरज-पुणे मार्गावरुन सुरुवात करण्यात आली. तथापी सांगोला व जेऊर येथील शेतकरी व व्यापाऱ्यांची मागणी विचारात घेऊन ही गाडी मिरज-कुर्डूवाडी-दौंडमार्गे वळविण्यात आली. ही ट्रेन रविवारी आठवड्यातून एकदा धावत आहे. अल्पावधीतच ही रेल्वेगाडी या भागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली. शेतकऱ्यांचा शेतातील माल अतिशय वेगवान आणि सुरक्षित मार्गाने वाहतूक करण्यात येत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात किसान रेल्वेकडे वळत असल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला ५० टक्केच भाडे
अन्न प्रक्रिया मंत्रालय किसान रेल्वेमार्फत अधिसूचित फळे आणि भाजीपाला वाहतुकीसाठी ५० टक्के अनुदान देत आहे. याचा परिणाम रोडवेजच्या तुलनेत रेल्वेने कमी खर्चात वाहतूक होत आहे. सांगोला-दानापूर, सांगोला-शालिमार, बंगळुरु-आदर्शनगर, सांगोला-सिकंदराबाद या चार गाड्या धावत आहेत. यातून सांगोला, जेऊर, करमाळा, पंढरपूर आदी परिसरातील शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त माल किसान रेल्वेने जात असल्याचे सांगण्यात आले.
सफरचंद, मासे, डाळिंब, पेरूचीही होतेय निर्यात...
केळी, पेरू, सीताफळ, बोरं इत्यादी विविध फळांच्या लोडिंगचे जेऊर हे केंद्र बनले आहे. कंदरची प्रसिद्ध केळी दिल्ली बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. आतापर्यंत या रेल्वेने जेऊर येथून ४५० टनाहून अधिक फळांची वाहतूक केली आहे. या वाहतुकीतून रेल्वेला २० लाखांहून अधिक कमाई एकट्या जेऊर स्टेशनवरून झाली आहे. सांगोला, जेऊर भागातून सफरचंद, केळी, डाळिंब, पेरू, पपई, लिंबू, मासे, कांदा आदींची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. याशिवाय आतापर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदी असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.