...अन् फुटपाथवर झोपलेल्या पोलिसांच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे, मिळाला हक्काचा निवारा
By सचिन जवळकोटे | Published: May 8, 2020 11:49 AM2020-05-08T11:49:24+5:302020-05-08T15:20:39+5:30
ही पहा 'कोरोना वॉरियर्स'ची अशीही दुर्दैवी अवस्था..
सचिन जवळकोटे
मुंबई - जगभरात कोरोनानं हाहाकार माजविला असताना भारताचा आकडाही झपाट्यानं वाढत चाललाय. त्यातही मुंबईची वाढती संख्या तर अत्यंत धक्कादायक. त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील अनेक 'एसआरपी' कंपन्या तातडीनं बोलावून घेण्यात आल्या आहेत. सोलापूर 'एसआरपी कॅम्प'मधील एक तुकडीही 'कोरोना वॉरियर्स' म्हणून मुंबईत दाखल झालीय. सोलापूरहून मुंबईला दाखल झालेल्या या तुकडीतील जवानांनी मुंबई गाठल्यानंतर रात्री चक्क पुटपाथवरच बिछाना टाकला. सोलापूरमधील या तुकडीचा फोटो काल राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचताच, त्यांनी या पोलिसांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. आपल्या शासकीय निवासस्थानाची आणि शिवालयाची किल्लीही त्यांनी पोलिसांसाठी पाठवली होती. मात्र, तत्पूर्वी पोलीस प्रशासनानं त्यांच्या विश्रांतीची व्यवस्था केली होती.
मुंबईत पोहोचलेले सोलापूरचे शंभर जवान रस्त्यावरच्या फुटपाथवरच कशीबशी वळकटी पसरून झोपल्याचे फोटो सोशल मीडियावर पाहून अनेकांना धक्काच बसला. त्यावरून प्रशासनावर टीकाही होत होती. मात्र, हे फोटो पाहून आदित्य ठाकरेंसह संबंधित यंत्रणांनी तातडी योग्य कार्यवाही केल्याचं समोर आलं आहे.
फोटो पाहताच, आदित्य ठाकरेंनी संबंधित अधिकाऱ्यांकडून या पोलिसांबाबत माहिती घेतली. पोलिसांना निवारा मिळावा यासाठी आपल्या सरकारी बंगल्याची चावीच (A6) त्यांनी देऊ केली. तसेच, शिवसेनेचं कार्यालय म्हणजेच शिवालयही तुमच्यासाठी खुलं असल्याचा निरोप त्यांनी एका टीमसोबत पाठवला. पण, निवासाची व्यवस्था नव्हती म्हणून हे पोलीस फुटपाथवर झोपले नव्हते, तर प्रवासामुळे आलेला थकवा घालवण्यासाठी तिथे पहुडले होते, असं चौकशीतून समजलं. त्यानंतर त्यांच्या राहण्या-खाण्याची योग्य व्यवस्थाही झाल्याचं कळतं.