अक्कलकोटच्या अधिकाºयांना सोलापूरचा सोस; बांधकाम कार्यालय पडलंय ओस...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 06:29 PM2018-12-03T18:29:29+5:302018-12-03T18:32:04+5:30
सार्वजनिक बांधकाम उपविभाग : ना अधिकारी, ना कर्मचारी, प्रत्येकाला पडतो प्रश्न, निर्जीव वस्तूच का कारभारी?
जगन्नाथ हुक्केरी/ शिवानंद फुलारी
अक्कलकोट : शनिवारी सकाळी साडेदहा वाजता़..स्थळ सार्वजनिक बांधकाम उपविभाग, अक्कलकोट. कार्यालयाची दारे सताड उघडी...आत अधिकाºयांचा पत्ता नाही...दिसला तो एकच मैलकुली...त्याच्याकडे विचारणा केली तर ‘माहीत नाही’ हा एकच शब्द. या मागची कारणे शोधली असता ‘लोकमत’च्या आॅन दी स्पॉटमध्ये एकेक नमुनेदार किस्से पुढे आले अन् स्पष्ट जाणवलं ‘अधिकाºयांना सोलापूरचाच सोस; अक्कलकोटचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय पडले ओस!’
अक्कलकोट स्टेशन रोडवर असलेल्या ए-वन चौकात सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय आहे. त्या कार्यालयात ना उपअभियंत्यांचा पत्ता, ना शाखा अभियंत्यांचा. स्वच्छतेसाठी आॅफिस बॉय तर आहे की नाही, याचीही उणीव भासली, तेथील अस्वच्छतेवरून. कार्यालयाच्या कानाकोपºयाचा धांडोळा घेतला तर रिकाम्या खुर्च्या, बंद पंखे अन् निर्जन कार्यालय. केवळ भिंती, खिडक्या, टेबल, अस्ताव्यस्त पडलेले कागद, फायली अन् पेपर वेट. या निर्जीव वस्तूच येथील कारभारी आहेत का, असा प्रश्न पडला. याशिवाय कार्यालय चालू आहे की बंद, याचीही शंका यावी, अशीच तºहा. नेहमीच कार्यालयात कोणीच नसल्याने चौकशी अन् तक्रार करण्यासाठीही कोणीच फिरकत नसल्याची बाब तर आणखीनच धक्कादायक. अक्कलकोट तालुक्याचा विस्तार मोठा. रस्ते छोटे. आहे ते सगळे वाळूच्या प्रेमामुळे खराब झालेले. त्यात असे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय वाºयावर... सोलापूरच्याच भरवशावर.... ‘वाट’ लागलेल्या रस्त्यांची कोणाकडे तक्रार करावी, तर सोलापूरला येऊनच. पण गावाच्या रस्त्यासाठी सोलापूरचे हेलपाटे अन् बांधकाम कार्यालयाचे उंबरठे झिजवायला वेळ तरी आहे कोणाकडे. यामुळे रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बकाल होत असताना कार्यालयातील अधिकारी सोलापुरात ‘झकास’ अन् अक्कलकोटमधील कार्यालय भकास, हेच समोर आले.
प्रकल्प शाखा विभागाचा दरवाजा उघडलेला. पण आत कोणीच नाही. होत्या त्या फक्त निर्जीव वस्तू. रेखाचित्र विभागाला कुलूप लावलेले. त्याच्या समोरच्या रूममध्ये कुलूपबंद कपाट अन् खुर्च्या. आडवा झालेला एक टेबल. तोही तुटक्या स्थितीत. कार्यालयाचा आत्मा असलेला प्रशासन विभाग उघडा दिसला. पण आत कोणीच प्रशासक नव्हते. एक उपअभियंता, चार जेई (कनिष्ठ अभियंते) त्यातील एकाची बढतीवर बदली झालेली. आहे ते तिघेही कुठेच दिसले नाहीत.
जीप सोलापुरात.. मुक्काम अक्कलकोटात
- कामाच्या ठिकाणी भेटी देण्यासाठी अधिकारी वापरत असलेली जीपही अधिकाºयांबरोबरच सोलापुरातच मुक्कामी आहे. लॉग बुकमध्ये मात्र अक्कलकोट मुक्कामी दाखविण्यात आले आहे. अधून-मधून रस्त्याच्या कामाच्या व्हिजिटला जीप अक्कलकोटला येते आणि काम उरकून पुन्हा सोलापूरच्याच मुक्कामी जाते, हे पाहणाºयांनी सांगितले.
निवासस्थानाचा वापर
- उपअभियंत्यांबरोबरच शाखा अभियंते व अन्य कर्मचारी मुख्यालयी असणे बंधनकारक असताना मात्र कोणीच त्या मुख्यालयी नसल्याचे स्पष्ट झाले. उपअभियंत्यांचे निवासस्थान तर विनावापरच असल्याचे तेथील अस्वच्छतेवरून जाणवले. परिसरातील नागरिकांनी या परिसरात खासगी मेकॅनिककडे दुरूस्तीसाठी आलेली वाहने लावली जात असल्याचे सांगितले.